दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राजधानी दिल्लीमध्ये १ एप्रिल २०२५ पासून १५ वर्षांहून जुन्या वाहनांना पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा बंद करण्यात येणार आहे. पर्यावरण मंत्री मजिंदर सिंग सिरसा यांनी शनिवारी पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे जुनी वाहने रस्त्यावरून हटविण्यास मदत होईल, तसेच वायू प्रदूषणाच्या प्रमाणात घट अपेक्षित आहे.
दिल्लीमध्ये आधीच १५ वर्षांहून जुनी पेट्रोल वाहने आणि १० वर्षांहून अधिक जुन्या डिझेल वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. अनेक वाहनधारकांनी एनओसी घेऊन ही वाहने इतर राज्यांमध्ये विकली आहेत. मात्र, अद्यापही काही ठिकाणी अशी वाहने चालविली जात असल्याचे दिसून येते. त्यामुळेच सरकारने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
बैठकीनंतर मंत्री सिरसा यांनी स्पष्ट केले की, “३१ मार्च २०२५ नंतर १५ वर्षांहून जुनी वाहने पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी येऊ शकणार नाहीत. या वाहनांची ओळख पटविण्यासाठी विशेष मोहिम राबविली जात आहे.” त्यांनी आम आदमी पक्षावर टीका करताना सांगितले की, “वायू प्रदूषणाच्या समस्येवर आम आदमी पक्षाने गांभीर्याने विचार केलेला नाही आणि सरकारचा निधी योग्य प्रकारे वापरलेला नाही.”
सिरसा यांनी असेही स्पष्ट केले की, फक्त वाहनांवरच निर्बंध लावले जाणार नाहीत, तर मोठ्या इमारती, हॉटेल्स आणि व्यावसायिक संकुलांमध्ये अँटी स्मॉग गन्स बसविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसेच, वायू प्रदूषण कमी करण्यासाठी वृक्षारोपण मोहिमेवरही भर दिला जाणार आहे. या मोहिमेत दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे.
बाहेरून येणाऱ्या वाहनांवर नियंत्रण – बाहेरून येणाऱ्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. बांधकाम आणि धूळ प्रदूषणावर लक्ष – बांधकाम स्थळांवर विशेष नियम लागू करून धूळ प्रदूषणावर नियंत्रण ठेवले जाईल. पडीक जमिनींवर जंगल उभारण्याचा प्रयत्न – शहरात हिरवळ वाढविण्यासाठी आणि पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी पडीक जमिनींवर झाडे लावली जातील. सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांना काही अडचणी येण्याची शक्यता आहे, परंतु प्रदूषण नियंत्रणासाठी हा निर्णय आवश्यक आहे. दिल्लीतील नागरिकांनी पर्यावरण रक्षणासाठी सरकारच्या उपाययोजनांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.