मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईतील लाखो नोकरदारांच्या घरगुती जेवणाचा डबा कार्यालयापर्यंत पोहोचविणाऱ्या प्रसिद्ध मुंबई डबेवाल्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. मुंबई डबेवाला असोसिएशनने हा निर्णय घेतला असून, भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईचे डबेवाले गेल्या अनेक दशकांपासून अविरत सेवा देत आहेत. कोणत्याही परिस्थितीत—ऊन, वारा, पाऊस असो—त्यांनी आपली सेवा खंडित होऊ दिलेली नाही. मात्र, डबेवाल्यांचे अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत, त्यात प्रामुख्याने परवडणाऱ्या घरांची मागणी आहे. यापूर्वी, मुंबई डबेवाला असोसिएशनने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना (ठाकरे गट) ला पाठिंबा दिला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रचारादरम्यान डबेवाल्यांसाठी विविध आश्वासने दिली होती. यात संघटित करून स्वतंत्र कंपनी स्थापन करणे, आर्थिक पाठबळ, सायकल खरेदी आणि पार्किंगसाठी सहकार्य, मुलांचे शिक्षण, कुटुंबासाठी आरोग्य सेवा, तसेच विश्रांतीसाठी “डबेवाला भवन” उभारणे यासारख्या आश्वासनांचा समावेश होता. मात्र, डबेवाला भवन वगळता अन्य कोणतेही आश्वासन पूर्ण झाले नाही.
शिवसेना (ठाकरे) गटाकडून मिळालेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे मुंबई डबेवाला संघटनेत मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे. मुंबई महानगरपालिकेवर पाच वर्षे सत्ता असूनही त्यांच्या समस्या सोडवल्या गेल्या नाहीत, अशी खंत संघटनेच्या अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी व्यक्त केली. आता, डबेवाला कामगारांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाकडून आशा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, मुंबईतील बहुतांश डबेवाले पुण्याचे रहिवासी आहेत आणि अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे डबेवाल्यांचा घराचा प्रश्न आणि अन्य मागण्या ते मार्गी लावतील, असा विश्वास असोसिएशनने व्यक्त केला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. डबेवाल्यांचा पाठिंबा ज्या पक्षाला मिळेल, त्याचा फायदा निवडणुकीत होऊ शकतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाला या पाठिंब्यामुळे बळ मिळेल, तर शिवसेना (ठाकरे) गटासाठी ही धक्कादायक बाब ठरू शकते. मुंबईतील डबेवाल्यांची भूमिका नेहमीच राजकीयदृष्ट्या महत्त्वाची राहिली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये त्यांचा हा निर्णय कोणता प्रभाव पाडतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.