कथ्थक नृत्यांगना निधी प्रभू यांच्याशी रंगला सुसंवाद !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्व. वसंतराव चांदोरकर प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘कथा-कथ्थक’ कार्यक्रमाच्या निमित्ताने कथ्थक नृत्यांगना निधी प्रभू (मुंबई) यांनी आज शनिवारी १ मार्च रोजी शहरातील कथ्थक विद्यार्थी, त्यांचे गुरू आणि पालकांशी संवाद साधला.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. निधी प्रभू यांनी कथ्थक नृत्याची सविस्तर माहिती दिली. लहानपणापासूनचा कथ्थक प्रवासातील त्यांचे अनुभव त्यांनी विद्यार्थिनींसोबत शेअर केले. कथ्थक आणि फ्लेमिंगो नृत्यातील साम्य आणि फरक त्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितले. भारतीय कथ्थक आणि आधुनिकता यांचा संबंध जोडून कथ्थक नृत्य जनमानसात कसे पोहोचवता येईल, यावर त्यांनी मार्गदर्शन केले.

संरचनाकार म्हणून बॉलिवूडमध्ये काम करताना आलेले अनुभवही त्यांनी कथन केले. पंडित बिरजू महाराज आणि संजय लीला भन्साळींसारख्या दिग्गजांसोबत काम करण्याचे अनुभव त्यांनी सांगितले. त्यांच्या या बोलण्याने कथ्थक शिकणाऱ्या विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक भारावून गेले. निधी प्रभू यांच्याशी झालेला हा संवाद खूपच यशस्वी ठरला.