


अडावद, ता. चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अडावद येथे वटपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. गावातील सुवासिनी महिलांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने वटसावित्रीचे व्रत पूर्ण केले. वडाच्या झाडाचे पूजन करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
वटपौर्णिमेनिमित्त सकाळपासूनच गावातील महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या सुवासिनींनी पूजेचे साहित्य घेऊन वटवृक्षाजवळ हजेरी लावली. स्थानिक शामराव येसो महाजन शाळेच्या प्रांगणात असलेल्या वडाच्या झाडाजवळ दुपारपासून महिलांची मोठी गर्दी झाली होती. दुपारी १२ वाजेपासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत महिलांनी शिस्तबद्ध पद्धतीने वटवृक्षाची पूजा केली. यावेळी धार्मिक परंपरांचे पालन करत सुवासिनींनी वटसावित्री व्रत पूर्ण केले. संपूर्ण परिसरात महिलांची लगबग आणि उत्साह पाहायला मिळाला.
यावेळी उपस्थित पुरोहितांनी मंत्रोच्चार करत विधीवत पूजाविधी पूर्ण करून घेतला. सुवासिनींनी वडाच्या झाडाला सुताचे दोरे गुंडाळून वटवृक्षाची प्रदक्षिणा घातली. तसेच सात जन्मी हाच पती मिळो, अशी श्रद्धापूर्वक प्रार्थना केली. पूजेनंतर महिलांनी एकमेकींना वाण देत वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. या धार्मिक सोहळ्यामुळे गावातील वातावरण भक्तिमय झाले होते. महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने वटपौर्णिमा उत्सवाला विशेष रंगत आली.



