Home प्रशासन दीपनगरातील आमरण उपोषण सहाव्या दिवशीही सुरूच ; आंदोलनकर्त्यांचा पोलिस दबावाचा आरोप

दीपनगरातील आमरण उपोषण सहाव्या दिवशीही सुरूच ; आंदोलनकर्त्यांचा पोलिस दबावाचा आरोप

0
19


फेकरी, ता. भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दीपनगर येथील भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राच्या २१० मेगावॅट गेटसमोर निळे निशाण कामगार संघाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आमरण उपोषण सोमवारी सहाव्या दिवशीही कायम राहिले. एस. पी. इंटरप्राईजेस कंपनीतील कामगारांना पुन्हा सेवेत सामावून घेणे, त्यांना न्याय मिळवून देणे तसेच स्थानिकांना रोजगारामध्ये प्राधान्य देण्याच्या मागण्यांवर अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उपोषणाच्या सहाव्या दिवशीही कंपनी व्यवस्थापन आणि संबंधित प्रशासनाकडून कोणतीही सकारात्मक भूमिका समोर न आल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी आपला लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. उपोषणावर बसलेल्या किरण बोदर, चरणसिंग राजपूत, अजर पटेल, धीरज पाटील, मयूर बोदर, अनिल भिरूड, निलेश कोळी, रवींद्र बाविस्कर, मानसिंग पाटील, प्रवीण जगताप, मयूर पाटील, हर्षल चौधरी, निलेश पाटील, समाधान पाटील, विशाल पाटील, स्वप्निल गोसावी आणि विजय मोरे यांची प्रकृती खालावत असल्याने आंदोलनस्थळी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. उपोषणकर्त्यांच्या आरोग्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कामगारांच्या मागण्यांवर तोडगा काढावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली. दरम्यान, तालुका पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू ठेवावे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी तसेच दोन्ही बाजूंमध्ये समन्वय साधून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र, यावेळी आंदोलनकर्त्यांनी पोलिस प्रशासनाकडून उपोषण मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला. उपोषण सुरू ठेवल्यास कारवाईचा इशारा देत आंदोलन संपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा त्यांनी केला. कोणत्याही दबावाला बळी न पडता मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी कंपनी व्यवस्थापन, प्रशासन आणि कामगार प्रतिनिधी यांची तातडीने त्रिपक्षीय बैठक घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही निळे निशाण कामगार संघाच्या वतीने देण्यात आला. दरम्यान, पोलिस प्रशासनाकडून दबाव अथवा धमकी दिल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला असून, या आरोपांवर पोलिस प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया वृत्त लिहिपर्यंत प्राप्त झालेली नव्हती.


Protected Content

Play sound