Home राजकीय गोसंरक्षणासाठी स्वतंत्र अभयारण्य उभारावे – खा. स्मिताताई वाघ  

गोसंरक्षणासाठी स्वतंत्र अभयारण्य उभारावे – खा. स्मिताताई वाघ  

0
17


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोमातेच्या संरक्षणासाठी शासनाने स्वतंत्र अभयारण्य उभारावे, अशी मागणी जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ यांनी केली. रावेर तालुक्यातील पाल येथील श्री वृंदावन धाम आश्रमात आयोजित श्री हरी गोपाल गौशाळेच्या लोकार्पण सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी गोसंरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येकाने गोसेवेसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

खासदार स्मिताताई वाघ म्हणाल्या की, गोमूत्र आणि शेणामुळे शेतीला नैसर्गिक खत मिळते तसेच पर्यावरणातील प्रदूषण कमी करण्यास मदत होते. गायीचे दूध अमृततुल्य असून धार्मिक आणि दैवी कार्यांमध्ये गायीचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्यामुळे शासनाने गायींच्या संरक्षणासाठी स्वतंत्र अभयारण्य उभारण्याचा विचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दि. २९ जून रोजी पाल येथील श्री वृंदावन धाम आश्रमात विद्यमान पदस्थ श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांच्या सानिध्यात महाराष्ट्र गौसेवा आयोगाच्या “गौ वर्धन गौवंश सेवा केंद्र” योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या श्री हरी गोपाल गौशाळेच्या शेडचे लोकार्पण करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात गौशाळेच्या उद्घाटनाने आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ, खंडवा येथील खासदार ज्ञानेश्वर पाटील, नेपानगरच्या आमदार मंजू दादू, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महामंडलेश्वर स्वामी पवनदासजी महाराज, ह.भ.प. मानेकर बाबा शास्त्री, योगी दत्तनाथजी महाराज यांच्यासह अनेक संत-महंत आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी योगी दत्तनाथजी महाराज यांनी महाराष्ट्र शासनाच्या गौसेवा आयोगाच्या कार्याचे कौतुक केले. महाराष्ट्रात गोशाळांना अनुदान मिळत असून हे अत्यंत चांगले कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमांवर होणारा अनावश्यक खर्च टाळून गोशाळांना दान देऊन गोसेवेला हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.

चंद्रशेखर नलावडे यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून शेतीमध्ये गोमातेच्या शेणाचा वापर करण्याचे महत्त्व सांगितले. मानेकर बाबा शास्त्री महाराज यांनी गोशाळा चालविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे सांगत गोसेवेसाठी समाजाने पुढे यावे, असे आवाहन केले. डॉ. रणजित पाटील यांनी गायींकडे केवळ धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज व्यक्त केली. देशी गायींच्या दुधात आयुर्वेदिक गुणधर्म असून गोमूत्राचेही अनेक उपयोग असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी रस्त्यावर प्लास्टिक न टाकण्याचे आवाहन केले.

अनंत प्रकाश शास्त्रीजी महाराज यांनी गोमाता आर्थिक आणि आध्यात्मिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगून प्रत्येक घरात गाय असावी, असा संदेश दिला. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी पूज्य बापूजींच्या स्वप्नपूर्तीसाठी गोपाल बाबाजी करत असलेल्या कार्याचे कौतुक केले. खासदार ज्ञानेश्वर पाटील यांनी गोशाळा उभारून गोमातेची सेवा करणे हे अत्यंत पवित्र कार्य असल्याचे नमूद केले. ह.भ.प. भरत महाराज यांनी कृषी, गोसेवा आणि व्यवसाय यांना प्रोत्साहन देणे देशहितासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. अन्न व उपजीविका समितीचे चंद्रशेखर चिखले यांनी पूज्य बापूजींच्या आशीर्वादाने आश्रमातील विविध कार्य वेगाने सुरू असल्याचे सांगितले. आमदार मंजू दादू यांनी गोसेवा हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे सांगत सर्वांनी गोपालनासाठी पुढे यावे, असे आवाहन केले. राघवानंद भारतीजी महाराज यांनी राग, द्वेष आणि स्वार्थ बाजूला ठेवून गोसेवेसाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. महामंडलेश्वर स्वामी पवनदासजी महाराज यांनी गोमातेचे महत्त्व स्पष्ट करताना शेण आणि गोमूत्र हे आरोग्य व शेतीसाठी उपयुक्त असल्याचे सांगितले.

धनंजय चौधरी यांनी पूज्य बाबाजींनी उभारलेली गौशाळा हे महान कार्य असल्याचे सांगून सर्वांनी या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी चंद्रशेखर चिखले, भीमसिंग राठोड, डॉ. रोहिदास राठोड, डॉ. रणजित पाटील, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी महाआरती करण्यात आली. तसेच विविध समित्यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने भाविक आणि गोसेवकांनी उपस्थित राहून गौशाळा लोकार्पण सोहळ्यात सहभाग नोंदविला.


Protected Content

Play sound