रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यात अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीविरुद्ध रावेर पोलिसांनी धडक ‘वॉशआऊट’ मोहीम राबवत दोन ठिकाणी कारवाई केली. सहस्त्रलिंग आणि नेहता शिवारात करण्यात आलेल्या या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये पोलिसांनी सुमारे ४० हजार रुपये किमतीचे हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे कच्चे रसायन नष्ट केले. या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली कारवाई सहस्त्रलिंग गावातील ईदगाह मैदानाच्या बाजूला असलेल्या टेकडीच्या पलीकडे, शेताच्या बांधालगत असलेल्या नाल्यात करण्यात आली. पोलिसांना या ठिकाणी सुमारे २०० लिटर गूळ-मोह मिश्रित कच्चे रसायन आढळून आले. या रसायनाची अंदाजे किंमत २३ हजार ३०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळीच हे रसायन नष्ट केले. या प्रकरणी आमीन भिकारी तडवी (रा. सहस्त्रलिंग) यांच्याविरुद्ध रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हातभट्टी दारू निर्मितीसाठी कच्च्या रसायनाचा साठा केल्याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दुसरी कारवाई नेहता शिवारातील चिमणी भट्टी परिसरात तापी नदीकाठी करण्यात आली. झाडाझुडपांमध्ये लपवून ठेवण्यात आलेले सुमारे १२० लिटर गूळ-मोह मिश्रित हातभट्टी दारूचे कच्चे रसायन पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी हे रसायनही घटनास्थळीच नष्ट केले.

या कारवाईप्रकरणी सुकलाल वसंत सोनवणे (रा. अजंदे) यांच्याविरुद्ध रावेर पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नदीकाठच्या परिसरात झाडाझुडपांचा आडोसा घेत हातभट्टी दारू निर्मितीसाठी कच्च्या रसायनाचा साठा करण्यात आल्याचे कारवाईत समोर आले.
ही कारवाई पोलिस निरीक्षक संदिप पाटील आणि पोलिस उपनिरीक्षक सखाराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस हेडकॉन्स्टेबल रुबाब तडवी, जगदीश पाटील, नितीन आमोदकर, विजय चौधरी, योगेश महाजन, कुंदन नागमल, तथागत सपकाळे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी या वॉशआऊट मोहिमेत सहभाग घेतला. रावेर तालुक्यात अवैध हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केल्याने अवैध दारू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. अशा प्रकारच्या अवैध व्यवसायावर अंकुश ठेवण्यासाठी पुढील काळातही धडक कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.



