Home क्राईम यावल तालुक्यात परप्रांतातून प्रतिबंधित गुटख्याची खुलेआम विक्री

यावल तालुक्यात परप्रांतातून प्रतिबंधित गुटख्याची खुलेआम विक्री

0
10

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यात शेजारील मध्यप्रदेशातून छुप्या मार्गाने प्रतिबंधित गुटखा, सुगंधी पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांची कथितपणे मोठ्या प्रमाणावर आवक होत असून, सार्वजनिक ठिकाणी त्यांची खुलेआम विक्री होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या प्रकारामुळे संबंधित यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, साठवणूक आणि वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध स्तरांवर कारवाया केल्या जातात. मात्र, यावल तालुक्यात काही ठिकाणी या पदार्थांची सर्रास विक्री सुरू असल्याचे चित्र दिसत असल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे प्रतिबंधित पदार्थांचा पुरवठा नेमका कुठून आणि कोणाच्या माध्यमातून होत आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

यावल तालुक्याला लागून मध्यप्रदेश राज्याची सीमा असल्याने या भागातून छुप्या मार्गाने प्रतिबंधित सुगंधी पानमसाला, गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थांची आवक होत असल्याचा आरोप आहे. लाखो रुपयांच्या या कथित अवैध व्यवसायामुळे तरुणांसह नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून, प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या राज्यातील विविध कारवायांची चर्चा होत असताना यावल तालुक्यातील परिस्थितीबाबत नागरिकांनी प्रशासनाकडे लक्ष वेधले आहे. बनावट दूध, बनावट मिठाई, भेसळयुक्त खाद्यतेल, खाद्यपदार्थ तसेच प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांविरोधात प्रभावी कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रतिबंधित गुटख्याची विक्री करणाऱ्या कथित विक्रेत्यांवर तसेच या पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या साखळीवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता प्रतिबंधित पदार्थांचा पुरवठा करणारे मुख्य सूत्रधार, साठवणूकदार आणि वाहतूकदार यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यावल तालुक्यात प्रतिबंधित गुटखा आणि बनावट दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीबाबत होत असलेल्या आरोपांची संबंधित विभागाने दखल घेऊन प्रत्यक्ष तपासणी व कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. प्रशासनाच्या कारवाईकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound