Home Cities पारोळा पारोळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. तुषार नेरकर यांचा जाहीर नागरी सत्कार 

पारोळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. तुषार नेरकर यांचा जाहीर नागरी सत्कार 

0
20


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. तुषार नेरकर यांची मुख्याधिकारी वर्ग-१ या पदावर पदोन्नती झाल्याबद्दल तसेच नगरपरिषदेत कायमस्वरूपी मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याच्या निमित्ताने पारोळा येथे जाहीर नागरी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात नगरपरिषद प्रशासन, पदाधिकारी, व्यापारी संघटना आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांचा सन्मान केला.

या सत्कार समारंभाचे अध्यक्षपद माजी नगराध्यक्ष अशोक वाणी यांनी भूषविले. तर व्यासपीठावर विद्यमान लोकनिर्वाचित नगराध्यक्ष चंद्रकांत भिकनराव पाटील, उपनगराध्यक्ष ॲड. रोहन मोरे, तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी डॉ. उल्हास देवरे, नायब तहसीलदार अमोल पाटील, शिवसेना गटनेते नितीन सोनार तसेच सत्कारमूर्ती डॉ. तुषार नेरकर उपस्थित होते. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी डॉ. उल्हास देवरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, हा सत्कार केवळ एका अधिकाऱ्याचा सन्मान नसून त्यांच्या कर्तृत्वाचा, प्रामाणिक कार्यपद्धतीचा आणि नगरपरिषदेच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे नगरपरिषदेच्या विविध योजनांना गती मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे विकासरथाची दोन चाके असून, शहराच्या विकासासाठी दोन्ही घटकांमध्ये समन्वय आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी डॉ. तुषार नेरकर यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांचा उल्लेख केला.

या कार्यक्रमास व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष केशव क्षत्रिय, मेडिकल असोसिएशनचे शरद वाणी, किराणा असोसिएशनचे अरुण वाणी, तसेच नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजेंद्र हिम्मत पाटील, अमोल शिरोळे, बापू मिस्तरी, दीपक अनुष्ठान, छोटू हिरामण पाटील, राजेंद्र कासार, गोपाल दाणेज, सुदाम बापू चौधरी यांसह अनेकांनी उपस्थित राहून सत्कार सोहळ्याला उत्साह दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक प्रकल्प अधिकारी चंद्रकांत महाजन यांनी केले. यावेळी नगरपरिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासन अधिकारी यामिनी लक्ष्मण जटे, स्थापत्य अभियंता सुमित पाटील, अंतर्गत लेखापरीक्षक सार्थक मोरस्कर, कर निर्धारण व प्रशासकीय सेवा संजय गीते, सभा अधीक्षक तथा स्वीय सहाय्यक किशोर चौधरी, शहर समन्वयक शुभम कंखरे, स्वीय सहाय्यक रमेश मोरे, विश्वास पाटील, संजय घुले, सतीश चौधरी आदींनी उपस्थिती लावली.


Protected Content

Play sound