यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, तडवी पंच कमेटी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी गौरव दिन आणि क्रांती दिनानिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी संस्कृतीचा गौरव, समाजप्रबोधन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान अशा विविध उपक्रमांनी हा दिवस उत्साहात साजरा केला जाणार आहे.
संयुक्त राष्ट्र संघाने ९ ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक आदिवासी दिवस’ म्हणून घोषित केल्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही किनगाव येथे आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन आणि सामाजिक ऐक्य दृढ करण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने होणार असून त्यानंतर गावातून भव्य जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. याशिवाय आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम, समाजप्रबोधनपर उपक्रम तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळाही आयोजित करण्यात आला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी, रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे, काँग्रेसचे पूर्व क्षेत्र जिल्हाध्यक्ष धनंजय शिरीष चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य आर. जी. पाटील, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्लीचे राष्ट्रीय निरीक्षक डॉ. नीरज चव्हाण, संयुक्त सचिव दिलरुबाब तडवी, सेंट्रल झोन सदस्य जाफरुला जमादार, यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार तसेच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्लीचे जिल्हा संघटक मुनीर तडवी तसेच किनगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच लुकमान कलंदर तडवी यांनी परिसरातील नागरिक, युवक, महिला आणि आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन केले आहे. जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या माध्यमातून आदिवासी समाजाची सांस्कृतिक परंपरा, सामाजिक एकता आणि शैक्षणिक प्रगतीचा गौरव करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून होणार असून, समाजातील नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे उद्दिष्ट आयोजकांनी व्यक्त केले आहे.



