Home Cities अमळनेर ऋषिपंचमीनिमित्त तापी-पांझरा संगमावर महिला भाविकांचा जनसागर 

ऋषिपंचमीनिमित्त तापी-पांझरा संगमावर महिला भाविकांचा जनसागर 

0
5


कळमसरे- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ऋषिपंचमीच्या पावन पर्वावर अमळनेर तालुक्यातील तापी व पांझरा नदीच्या संगमस्थळी शाही स्नानासाठी खान्देशभरातून महिला भाविकांची अभूतपूर्व गर्दी झाली. जळगाव, धुळेनंदुरबार जिल्ह्यातून आलेल्या जवळपास १२ हजारांहून अधिक महिला भाविकांनी पहाटे पाच वाजेपासून ते सायंकाळपर्यंत तापी-पांझरा आणि गुप्तगंगेच्या पवित्र संगमात स्नान करून पुरातनकालीनश्रीक्षेत्र कपिलेश्वरत्रिपिडी महादेवाचे भाविकतेने दर्शन घेतले.

ऋषिपंचमीच्या दिवशी अशा पवित्र तीर्थक्षेत्रावर स्नान केल्याने दुःखाचे निवारण होऊन संकटे नष्ट होतात, असे महात्म्य असल्याने खान्देशाच्या कानाकोपऱ्यातून महिला भाविक कपिलेश्वर धाम येथे दाखल झाल्या होत्या. यावेळी तापी-पांझरा संगमावर जलपूजन, ऋषीपूजन आणि तापी महाआरतीचा भव्य दिव्य सोहळा पार पडला. याप्रसंगी आचार्य महामंडलेश्वर स्वामी हंसानंदतीर्थ महाराज यांनी दुपारी १ ते २:३० दरम्यान ऋषिपंचमी महात्म्यावर विशेष प्रवचन दिले. या प्रवचनाचा आणि महादेवाच्या दर्शनाचा हजारो महिलांनी लाभ घेतला. अमळनेर, पारोळा, पाचोरा, चोपडा, शिरपूर, शिंदखेडा, धुळे आणि नंदुरबार येथून आलेल्या भाविकांमुळे संपूर्ण मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. निम, मुडावद आणि अमळनेर येथील व्यापाऱ्यांनी पूजेच्या साहित्याची दुकाने थाटली होती.

नदीपात्रात पुरामुळे पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने मंदिर संस्थानतर्फे सुरक्षेच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्यात आली. महिला स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते, तसेच भाविकांनी डोहात न उतरता काठावरच स्नान करावे, अशा सूचना ध्वनिक्षेपकावरून वारंवार दिल्या जात होत्या. भाविकांच्या सोयीसाठी कपिलेश्वर महादेव मंदिर ट्रस्टतर्फे निवास, प्रवचन मंडप आणि विश्रांतीची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. वाहतूक नियंत्रणासाठी आणि सुरक्षेसाठी मारवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साजिद मन्सूरी व महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त तैनात होता. वाहनांची संख्या प्रचंड असल्याने निम ते श्रीक्षेत्र कपिलेश्वर दरम्यान सुमारे दोन किलोमीटर दुतर्फा रांगा लागल्या होत्या. अमळनेर आगाराची थेट बससेवा आणि खाजगी वाहनांच्या सहकार्यामुळे महिला भाविकांची मोठी सोय झाली.

श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, सचिव मघन पाटील, उपाध्यक्ष सी. एस. पाटील, विश्वस्त तुकाराम पाटील, डॉ. एल. डी. चौधरी, सुभाष पाटील, लादू पाटील, आचार्य महेश महाराज आणि समस्त भक्त परिवाराने या सोहळ्याचे यशस्वी नियोजन केले.


Protected Content

Play sound