Home Cities जळगाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नशिराबादेत विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नशिराबादेत विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन 

0
7


नशिराबाद- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी नशिराबाद शहराच्या वतीने ‘सेवा, समर्पण आणि जनसेवा’ या भावनेतून विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेला विशेष सेवा पंधरवाडा अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पाडण्याचा निर्धार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे.

या उपक्रमांचा शुभारंभ १७ सप्टेंबर रोजी नशिराबाद येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरात भव्य दीपोत्सवाने होणार आहे. या सेवा पंधरवड्यादरम्यान सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तसेच शालेय व युवा पिढीच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भव्य रांगोळी स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. याशिवाय विविध सामाजिक विषयांवर आणि शासकीय योजनांवर प्रकाश टाकण्यासाठी पथनाट्यांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जाणार आहे.

समाजासाठी निरंतर सेवा देणाऱ्या घटकांचा गौरव करण्यासाठी सफाई कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविकांचा विशेष सेवाभावी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या स्थानिक विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञांमार्फत विशेष मार्गदर्शक शिबिरदेखील घेतले जाणार आहे. नशिराबाद शहरात आयोजित या सर्व लोककल्याणकारी व सामाजिक कार्यक्रमांचा सर्व नागरिकांनी, महिलांनी आणि विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीला लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्यासह नगरसेवक प्रदीप बोढरे, मनोज पाटील तसेच भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चाचे (भाजयुमो) विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound