जळगांव प्रतिनिधी | जळगाव येथे संपंन्न होणाऱ्या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलच्या पोस्टरचे अनावरण लेवा एज्युकेशनल युनियनचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय व अजिंठा फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने १५ व १६ जानेवारी २०२२ दरम्यान जळगाव येथे राज्यस्तरीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यात येत आहे. डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात ”सृदृढ मानसिकतेसाठी प्रत्येकाने एक कला जोपासणे आवश्यक आहे” असे प्रतिपादन नंदकुमार बेंडाळे यांनी केले व जळगावमध्ये होणाऱ्या या फिल्म फेस्टिवलच्या आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या.
या फिल्म फेस्टिव्हलमध्ये शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी, कॅम्पस फिल्म व ऍनिमेशन फिल्म या चार विभागांत, कुटुंब, माझे गाव, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, पर्यावरण, लॉकडाऊन- अनलॉकडाऊन, उद्योजकता, शिक्षण आणि कौशल्य विकास, भारतीय संस्कृती आणि जीवनमूल्य या विषयांवर चित्रपट मागविले जात आहेत. प्रत्येक विभागासाठी रोख पारितोषिक व करंडक असे पुरस्काराचे स्वरूप असून सहभाग घेणाऱ्या प्रत्येक चित्रपटास सहभाग प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह दिले जाणार आहे.
दोन दिवसीय या चित्रपट महोत्सवात चित्रपट दाखविण्या सोबतच अभिनेता, दिग्दर्शक, पटकथा लेखक प्रा.योगेश सोमण, जेष्ठ अभिनेते अरुण नलावडे, युवा दिग्दर्शक, पटकथा लेखक दिग्पाल लांजेकर इत्यादी चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांचा सहवास तसेच कलाकार, दिग्दर्शक, पटकथाकार, तंत्रज्ञ यांच्या कार्यशाळा होणार असून सोबतच चित्रपट दिंडी, प्रदर्शनी, टुरिंग टॉकीज यांसारखे अभिनव उपक्रमसुद्धा होणार आहेत.
जळगाव मध्ये प्रथमच होत असलेल्या या चित्रपट महोत्सवास राष्ट्रीय स्तरावर कार्यरत भारतीय चित्र साधना या संस्थेचे पाठबळ असून शहरात होणाऱ्या या चित्रपट महोत्सवात राज्यातील सर्व संस्था, कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांनी ५ जानेवारी पर्यंत आपापले चित्रपट पाठवावे असे आवाहन संयोजन समिती द्वारे करण्यात आले आहे. महोत्सवाच्या अधिक माहितीसाठी चित्रपट निर्मात्यांनी 9892906374 व 9766201676 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
पोस्टर अनावरणाच्या या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या प्राचार्य व प्रमुख आयोजक प्रा. डॉ. गौरी राणे, महोत्सवाच्या समन्वय समितीचे अध्यक्ष तथा चित्रसाधना जळगाव विभागचे सहसंयोजक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, समन्वय समिती उपाध्यक्ष तथा प्रांत सहसंयोजक विनीत जोशी, देवगिरी चित्र साधनाचे प्रांत संयोजक किरण सोहळे, गौरव नाथ, पंकज सोनवणे, प्रशांत वैष्णव, महाविद्यालयाच्या फिल्म मेकिंग अँड ड्रॅमटिक्स विभाग प्रमुख सुचित्रा लोंढे, जिल्हा संयोजक भुषण खैरनार आदींची उपस्थिती होती.