प्रविण्य मिळविणाऱ्या खेळाडूंना पारितोषिक देण्याचा विद्यापीठाचा ठराव

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारात प्राविण्य प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहनपर आर्थिक स्वरूपात पारितोषिक  देण्याचा ठराव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.

कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि.२९ एप्रिल रोजी व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. विद्यापीठाकडून अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये प्राविण्य प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना रोख रक्कम दिली जाते. आता खेलो इंडियामध्ये विद्यापीठाकडून जे विद्यार्थी सहभागी होऊन प्राविण्या प्राप्त करतील त्यांनाही रोख रक्कम देण्याचा ठराव आजच्या बैठकीत ठेवण्यात आला होता. तो ठराव मंजूर झाला. वैयक्तीक क्रीडा प्रकारात सुवर्णपदक प्राप्त खेळाडूला २० हजार रूपये, रौप्यपदक विजेत्यास रूपये १५ हजार, आणि कास्यपदक विजेत्यास रू. १० हजार, तर सांघिक क्रीडा प्रकारात सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या संघातील प्रत्येक खेळाडूस रू.१५ हजार, रौप्यपदक विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूस रू.१० हजार आणि कास्यपदक विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूस रू.५ हजार असे पारितोषिक विद्यापीठाकडून दिले जाणार आहे.

विशेष म्हणजे शुक्रवारी हा ठराव मंजूर झाला आणि याच दिवशी खेलो इंडिया मध्ये भारत्तोलनमध्ये सुर्वणपदक प्राप्त गोविंद महाजन (व्ही.एस.नाईक महाविद्यालय,रावेर), रौप्यपदक विजेते किरण मराठे व उदय महाजन (व्ही.एस.नाईक महाविद्यालय,रावेर) या तिघांना कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी व व्यवस्थापन परिषद सदस्यांच्या उपस्थितीत धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. तसेच अखिल भारतीय तायक्वोदो स्पर्धेतील रौप्यपदक विजेता पुष्पक महाजन (धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर) आणि अखिल भारतीय आंतरविद्यापीठ भारत्तोलन स्पर्धेतही पारितोषिक प्राप्त केलेल्या अभिषेक महाजन, गोविंद महाजन व उदय महाजन यांना धनादेश देऊन गौरविण्यात आले.

यावेळी संघाचे प्रशिक्षक डॉ.गोविंद मारतळे (डी.एन.महाविद्यालय, फैजपूर) संघव्यवस्थापक डॉ.मुकेश पवार (कला,वाणिज्य महाविद्यालय, भालोद), व्ही.एस.नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.व्ही.दलाल, धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, संघव्यवस्थापक डॉ. संजय भावसार (राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय, पारोळा) व प्रा.उमेश पाटील (व्ही.एस.नाईक महाविद्यालय, रावेर) यांचाही सत्कार कुलगुरू आणि व्यवस्थापन परिषद सदस्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील यांनी खेळाडूंच्या कामगिरी विषयी सविस्तर माहिती दिली. एकूण १ लाख ५ हजार रुपये रकमेचे धनादेश आज देण्यात आले.

आजच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत दि.२४ मे रोजी होणाऱ्या दीक्षांत समारंभाविषयी चर्चा झाली. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार असून नॅकचे अध्यक्ष डॉ. भुषण पटवर्धन हे दीक्षांत भाषण करणार आहेत.  या समारंभात प्राधिकरणाचे सर्व सदस्य खादी कापडाच्या गणवेशात उपस्थित राहणार आहेत. तसा निर्णय आजच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीस प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे, दिलीप पाटील, प्राचार्य आर.एस.पाटील, प्राचार्य एल.पी.देशमुख, प्रा.मोहन पावरा, प्राचार्य आर.पी.फालक, महेश घुगरी, दीपक पाटील, विवेक लोहार, प्रा.जे.बी.नाईक, डॉ.प्रिती अग्रवाल,प्रभारी कुलसचिव प्रा.के.एफ.पवार, प्रभारी वित्त व लेखा अधिकारी एस.आर.गोहील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा.दीपक दलाल उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!