
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वाढते तापमान आणि पाण्याचा वाढता ताण या गंभीर समस्यांवर उपाय शोधण्यासाठी जळगाव महानगरपालिका आणि अखिल भारतीय आपत्ती व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या ‘हिट ॲक्शन प्लॅन’ अंतर्गत करण्यात आलेल्या विशेष सर्वेक्षणातून महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आले आहेत. या सर्वेक्षणात अत्याधुनिक इन्फ्रारेड कॅमेऱ्यांच्या साहाय्याने शहरातील विविध भागांचे तापमान मोजण्यात आले असून, काँक्रीटचे रस्ते डांबरी रस्त्यांच्या तुलनेत अधिक तापत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकल्पांतर्गत शहरातील मुख्य रस्ते, चौक, झाडांची सावली आणि विविध बांधकाम साहित्यांचे तापमान अचूकपणे नोंदवले जात आहे. Jalgaon Municipal Corporation आणि All India Disaster Management Institute Ahmedabad यांच्या संयुक्त उपक्रमातून हे सर्वेक्षण राबवले जात असून, इन्फ्रारेड टेम्परेचर गनच्या माध्यमातून ऑन-फील्ड डेटा संकलन केले जात आहे. या निरीक्षणांमुळे शहरातील उष्णतेच्या वास्तव परिस्थितीचा सखोल अभ्यास करणे शक्य झाले आहे.
सर्वेक्षणात असे निदर्शनास आले की काँक्रीटचे रस्ते उन्हात मोठ्या प्रमाणात उष्णता शोषून घेतात आणि ती दीर्घकाळ टिकवून ठेवतात. याउलट डांबरी रस्ते जरी दिवसा तापत असले तरी संध्याकाळनंतर किंवा ऊन कमी झाल्यावर ते तुलनेने लवकर थंड होतात. त्यामुळे काँक्रीट रस्त्यांच्या भागात रात्रीच्या वेळीही उष्णतेचे प्रमाण जास्त जाणवत असल्याचे या अभ्यासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकल्पाचे समन्वयक अमोल काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात ‘हीट आयलंड इफेक्ट’ अधिक तीव्र होत असल्याचे प्राथमिक निष्कर्षांमधून दिसून आले आहे. काँक्रीटचे पृष्ठभाग उष्णता अधिक काळ साठवून ठेवत असल्याने शहरातील तापमान सतत वाढलेले राहते, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाचे अभियंता प्रकाश पाटील यांनी सांगितले की, या सर्वेक्षणातून मिळणाऱ्या वैज्ञानिक माहितीच्या आधारे शहरासाठी ‘हिट ॲक्शन प्लॅन’ तयार करण्यात येणार आहे. यामध्ये हरित आच्छादन वाढवणे, झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड करणे आणि भविष्यातील रस्ते बांधणीसाठी पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे यावर भर दिला जाणार आहे.
सर्वेक्षणादरम्यान काँक्रीट व डांबरी रस्त्यांचे तापमान तसेच झाडांच्या सावलीतील तापमान यामध्ये लक्षणीय फरक आढळून आला. झाडांच्या सावलीमुळे परिसरातील तापमान लक्षणीयरीत्या कमी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे शहरात अधिकाधिक झाडे लावणे ही उष्णतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाययोजना ठरणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.



