Home Cities रावेर कोचुर खुर्द ग्रामपंचायतीवर दुर्लक्षाचा आरोप; कामे प्रलंबित

कोचुर खुर्द ग्रामपंचायतीवर दुर्लक्षाचा आरोप; कामे प्रलंबित


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  कोचुर खुर्द ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या दलित वस्तीत मूलभूत सुविधांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच व सदस्य या भागातील प्रश्नांकडे पुरेसे लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार दलित वस्तीत गटारी, रस्ते, वीज खांबांवरील दिवे आदी मूलभूत सुविधा दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. गावातील इतर भागात विकासकामे होत असताना दलित वस्ती मात्र दुर्लक्षित राहत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

तसेच आमदार व खासदार निधीतूनही या भागात एकही विकासकाम करण्यात आले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, दलित वस्तीला जाणीवपूर्वक विकासापासून वंचित ठेवले जात असल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, ग्रामपंचायतीत समस्या मांडण्यासाठी गेलेल्या नागरिकांना योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रारही समोर आली आहे. काही वेळा अपमानास्पद भाषा वापरणे, अयोग्य वर्तन करणे असे प्रकार घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. एका घटनेत वस्तू फेकल्याचाही आरोप करण्यात आल्याने वातावरण अधिक तणावपूर्ण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी तसेच दलित वस्तीत आवश्यक ती विकासकामे त्वरित सुरू करावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound