नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद येथे ‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर आणि नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विविध आरोग्य जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कीटकजन्य, जलजन्य आणि संसर्गजन्य आजारांविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासह गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी, एचपीव्ही लसीकरणाबाबत मार्गदर्शन आणि आरोग्य रॅली अशा विविध उपक्रमांमुळे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे आणि जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबादचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमन पटेल आणि डॉ. स्नेहा कोलते यांच्या सूचनेनुसार आयुष्मान आरोग्य मंदिर नशिराबाद तसेच गावात विविध आरोग्यविषयक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.

अभियानांतर्गत डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया यांसारख्या डासांपासून होणाऱ्या कीटकजन्य आजारांबाबत जनजागृती रॅली काढण्यात आली. नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यात आली तसेच माहितीपर पत्रकांचे वाटप करून स्वच्छता आणि डास नियंत्रणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. याशिवाय कुष्ठरोग आणि क्षयरोग यांसारख्या संसर्गजन्य आजारांबाबत जनजागृती करण्यात आली. एचपीव्ही (HPV) लसीकरणाचे महत्त्व, त्याचे आरोग्यदायी फायदे आणि वेळेवर लसीकरणाची आवश्यकता याविषयी नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली. महिलांमध्ये आणि पालकांमध्ये या विषयाबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अभियानादरम्यान गर्भवती महिलांची रक्त तपासणीसह आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांना योग्य आहार, नियमित वैद्यकीय तपासणी आणि सुरक्षित मातृत्वाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गावातून आरोग्य जनजागृती रॅली काढून नागरिकांना स्वच्छता, आरोग्य आणि प्रतिबंधात्मक उपायांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. संपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य सहाय्यक लुकामान तडवी, आरोग्य सेवक सुनील गोविंद ढाके, दीपक तायडे, वासुदेव पाटील, प्रयोगशाळा तंत्रज्ञ विजय सपकाळे, नीलिमा येलगिरे तसेच आरोग्य सेविका सुवार्ता ढालवाले, बफी साळुंके, हसरा तडवी आणि आशा सेविकांनी परिश्रम घेतले. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे सर्व उपक्रम प्रभावीपणे पार पडले.



