मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथील जे. ई. स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महापुरुषांच्या विचारांचा जागर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रभावी वक्तृत्व सादर केले. राष्ट्रप्रेम, सामाजिक समता आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. एम. चौधरी, उपमुख्याध्यापिका श्रीमती व्ही. के. शिर्के, पर्यवेक्षक के. आर. कवळे, व्ही. डी. बऱ्हाटे तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात आर. पी. पाटील यांनी लोकमान्य टिळक यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, राष्ट्रभक्ती, शिक्षणविषयक विचार आणि समाजजागृतीच्या कार्याचा सविस्तर आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे सौ. आर. व्ही. महाजन यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, समाजप्रबोधन आणि वंचित समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती देत त्यांच्या संघर्षमय जीवनातून प्रेरणा घेण्याचा संदेश दिला.

महापुरुषांच्या कार्याचा विद्यार्थ्यांवर अधिक प्रभाव पडावा यासाठी वक्तृत्व स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी आणि इयत्ता आठवी ते दहावी अशा दोन गटांमध्ये घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण आणि प्रभावी भाषणांद्वारे महापुरुषांचे विचार, त्यांचे समाजकारण, राष्ट्रसेवा आणि साहित्यिक योगदान यांचे प्रभावी सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. या कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती एल. व्ही. पाटील, सौ. आर. बी. महाजन आणि आर. पी. पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एल. व्ही. पाटील यांनी प्रभावीपणे पार पाडले. शिक्षकांच्या नियोजनामुळे आणि विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.



