मुंबई (वृत्तसंस्था) छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक जमिनी विकण्याकरीता परवानगी मिळावी म्हणून उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा अबाधित राहिला पाहिजे.त्यामुळे छत्रपतींच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजे यांना परवानगी देण्याचे आमिष भाजपने दाखवले असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रयत्न हाणून पाडेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. उदयनराजे भोसले हे १९९९ पूर्वी भाजपचे आमदार व मंत्री होते. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा पराभव केला होता. नंतर ते त्यांच्या मातोश्रींच्या माध्यमातून शरद पवारांना भेटले. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना खासदार केले. त्यांना खासदार केल्यानंतरही ते वारंवार पक्षविरोधी भूमिका घेत होते. निवडणुका जवळ आल्या की, ते पुन्हा मातोश्रींच्या माध्यमातून पवारांना भेटायचे. तिकीट मिळवायचे आणि पुन्हा निवडून यायचे, असा टोलाही त्यांनी लगावला.