महाराष्ट्राचा पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | काही महिन्यापासून महाराष्ट्राचे अनेक प्रकल्प गुजरातला जात आहे. त्यात आता अजून भर पडली आहे त्यातील सिंधुदुर्गातील पर्यटनाचा मोठा प्रकल्प गुजरातला जाणार आहे.

२०१८ मध्ये सिंधुदुर्गामध्ये पहिल्या पाणबुडी प्रकल्पाची घोषणा करण्यात आलेली होती. त्यापूर्वीही पर्यटन क्षेत्राला चालना देणाऱ्या अनेक प्रकल्पांची घोषणा करण्यात आलेली. मात्र अद्याप कोणताही मोठा प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही. सिंधुदुर्गच्या निवती रॉक्सजवळील समुद्रामध्ये पाणबुडी प्रकल्प येणार होता. परंतु हा प्रकल्प गुजरातला जाण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.

२०१८ मध्ये महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पर्यटन विकासासाठी १ हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आलेली होती. सिंधुदुर्गमधील प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटकांना खोल समुद्राच्या पाण्यातील अंतरंग अनुभवता येणार होते. आता हा प्रकल्प गुजरातच्या द्वारका येथे होणार आहे. गुजरात सरकारने त्यासाठी माझगाव डॉक लिमिटेडसोबत करार केला आहे.

गुजरात टुरिझमचे व्यवस्थापकीय संचालक पारधी यांनी सांगितलं की, या प्रकल्पामुळे पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. तर एमएलडीचे अध्यक्ष संजीव सिंघल यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्याचं नमूद केलं. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

Protected Content