चोरीच्या मुद्देमालासह दोन चोरटे अटकेत; मुक्ताईनगर पोलीसांची कारवाई !


मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर पोलिसांनी आपल्या कार्यक्षमतेचे प्रदर्शन करत, बंद घराच्या चोरीचा एक गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून सुमारे ४०,००० रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

निमखेडी बु., ता. मुक्ताईनगर येथील रहिवासी वैभव विकास पाटील यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चांदीचे देव, मोबाईल फोन, रोख रक्कम आणि मोटारसायकल असा एकूण ५६,००० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी २३ जून रोजी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक जाधव यांच्याकडे सोपवण्यात आला होता. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे आणि पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने सूत्रे हलवली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे, अवघ्या १२ तासांत या गुन्ह्याचा छडा लागला आणि दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले.

पोलिसांनी ताब्यात घेतलेले आरोपी गोपाल उर्फ सुरेशसिंग सिमाभाई सोलंकी आणि गणेश सिमाभाई सोलंकी हे दोघे चिखल्या, ता. अंजड, जि. बडवाणी, मध्यप्रदेश येथील असून, सध्या ते सिनफाटा, हलखेडा, ता. मुक्ताईनगर येथे राहत होते. गेल्या १० वर्षांपासून हे दोघेही स्थानिक शेतकऱ्यांकडे काम करत असल्याचे समोर आले आहे.

चौकशीदरम्यान, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ३० हजार रुपये किमतीची मोटारसायकल, ५ हजार रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल, आणि ५ हजार रुपये किमतीचे चांदीचे देव असा एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कौतुकास्पद कामगिरी पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक जाधव, पोलीस नाईक प्रदीप इंगळे, हरीश गवळी, पोलीस अंमलदार अनिल देवरे, सागर साबे आणि प्रविण जाधव यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.