उड्डाणपुलावरून दुचाकी खाली कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईच्या गोरेगाव परिसरात दुचाकी उड्डाणपुलावरून २० फूट खाली कोसळल्याची घटना घडली. या घटनेत दुचाकीवरील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली. उड्डाणपुलाखाली दुचाकीजवळ त्यांचे मृतदेह पडलेले आढळल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना कळवले. यानंतर पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. याप्रकरण पोलीस अधिक तपास करीत आहे. वैभव गमरे आणि त्याचा मित्र आनंद इंगळे अशी मृतांची नावे आहेत. गमरे हे एका खासगी कंपनीत नोकरीला असून पत्नीसह गोरेगाव पश्चिमेकडील तीन डोंगरी येथे वास्तव्यास होते. तर, इंगळे गोरेगाव पूर्व येथील रहिवासी होते. त्यांचे कुटुंबीय अकोला येथे त्यांच्या मूळ गावी राहतात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असताना पहाटे ४ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. गोरेगाव पश्चिमेकडील एमटीएनएल जंक्शनच्या दिशेने जाणाऱ्या पूर्व-पश्चिम उड्डाणपुलाखाली दोन जण जखमी अवस्थेत पडल्याची माहिती मोबाइल १ व्हॅनवरील नाईट ड्युटी कॉन्स्टेबलला पहाटे ४ वाजून २५ मिनिटांनी मिळाली. कॉन्स्टेबलने घटनास्थळी धाव घेऊन बेशुद्ध अवस्थेत असलेल्या दोघांना बाळ ठाकरे ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी गमरे यांच्या पत्नीचा शोध घेऊन त्यांना अपघाताची माहिती दिली आणि दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.

Protected Content