मनसुख हिरेन हत्याकांडात आणखी आरोपींच्या अटकेची शक्यता

 

 मुंबई : वृत्तसंस्था । एटीएस अर्थात दहशतवाद विरोधी पथकाने आज पत्रकार परिषद घेऊन  माहिती दिली.  तपास अजूनही सुरू असून अजून काही लोकांना अटक होऊ शकते”, अशी माहिती एटीएसचे प्रमुख जयजीत सिंग यांनी दिली आहे.

 

त्यामुळे  फक्त मारेकऱ्यांचा शोध लागला असून त्यामागचं कारण अद्याप अज्ञातच राहिल्याचं स्पष्ट झालं आहे. २५ मार्चला एनआयएकडे सचिन वाझे यांच्या कस्टडीसाठी मागणी केली जाईल, असं देखील या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

अँटिलियाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांच्या मालकीची असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर मनसुख हिरेन यांचा ठाण्याच्या खाडीत मृतदेह सापडल्यामुळे  गूढ वाढलं होतं. एटीएसकडून अँटिलियाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्यांचं प्रकरण एनआयएकडे हस्तांतरीत करण्यात आलं तर मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएसकडेच ठेवण्यात आला. त्यामध्ये आता एटीएसला मोठं यश मिळालं असून दोन मारेकऱ्यांना अटक केल्याचं एटीएसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

नेमका गुन्हा कसा घडला, हे आरोपी विनायक शिंदेनं घटनास्थळी जाऊन सांगितलं”, असं जयजीत सिंग यांनी  सांगितलं आहे. “गुन्ह्यात वापरलेल्या सिम कार्डचा एटीएसने शोध लावला. हे सिमकार्ड एका बुकीने गुजरातमधील एका कंपनीच्या नावे खरेदी केले होते. प्राथमिक चौकशीत सिमकार्ड नरेश गोर याने सचिन वाझे याच्या सांगण्यावरून आरोपी विनायक शिंदेकडे दिल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून या दोघांना अटक करण्यात आली आहे. विनायक शिंदे लखनभैय्या एन्काऊंटर प्रकरणी अटकेतला आरोपी आहे. तो पॅरोलवर असताना हा गुन्हा त्याने केला. त्याने मनसुखला घटनास्थळी बोलवून घेऊन आणि हत्येत प्रत्यक्ष सहभाग घेतल्याचे पुरावे मिळाले आहेत. आरोपीने घटनास्थळी जाऊन गुन्हा कसा केला, याचे प्रात्याक्षिक केले आहे”, असं जयजीत सिंग यांनी एटीएसकडून सांगितलं.

 

 

 

एटीएसने दमन-दीवमधून एक संशयित वॉल्वो आणि तिच्या मालकाला ताब्यात घेतले आहे. या वॉल्वोचा देखील गुन्ह्यात सहभाग असू शकतो, असा संशय एटीएसला आहे.

 

 

या वॉल्वोचा मालक मनिष भतिजा असून तो देवेंद्र फडणवीसांच्या गुडबुक्समधला बिल्डर असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

Protected Content