धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या मोबदल्यासाठी लाच घेताना मनरेगा पंचायत समिती धरणगाव येथील दोन कंत्राटी अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई २१ मार्च रोजी करण्यात आली.
तक्रारदाराने आपल्या शेतशिवारात गोठा शेड उभारणीसाठी कार्यारंभ आदेश मिळावा यासाठी अर्ज केला होता. यासाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रविण दिपक चौधरी (वय ३९, रा. म्हसवे, ता. पारोळा) यांनी २००० रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तडजोडीअंती १५०० रुपये स्वीकारण्यात आले. तसेच तांत्रिक सहाय्यक उमेश किशोर पाटील (वय ३६, रा. दोंदवाडे, ता. चोपडा) यांनी जागेची जीपीएस प्रणालीद्वारे नोंदणी करण्यासाठी तक्रारदाराकडून पेट्रोल पाण्यासाठी पैसे स्वीकारण्यास सहमती दर्शवली.
या प्रकाराची माहिती मिळताच जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि लाच स्वीकारताना दोघांना रंगेहात पकडले. त्यांच्याविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे व पोलीस हवालदार बाळू मराठे, पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने आणि अमोल सुर्यवंशी यांच्या पथकाने यशस्वी सापळा रचून ही कारवाई पूर्ण केली. आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात येत असून, पुढील तपास सुरू आहे.