भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील रिंग रोड जवळील योग केंद्रात वासुदेव जेष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
सभेच्या प्रारंभी दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर 2016 पासून संघाच्या वाटचालीचा आढावा घेत विविध उपक्रमांचे सिंहावलोकन करण्यात आले. आरोग्य मेळावे, चर्चा सत्रे, सहली, स्नेहसंमेलन, स्नेह भोजन आणि सत्कार समारंभ यांसारख्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. पदभार सोडताना काही पदाधिकारी आणि सभासद भावनिक झाले, तर काहींनी आपल्या आठवणींना उजाळा देत भावनावेगाने अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
सर्वानुमते संघाची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी प्रकाश पाटील, सचिवपदी सतीश जंगले, सहसचिवपदी संजय चौधरी, उपाध्यक्षपदी भानुदास पाटील आणि कोषाध्यक्षपदी जीवराम शिवतुरे यांची एकमताने निवड झाली. मागील कार्यकारिणीला मार्गदर्शक मंडळ म्हणून घोषित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी नेत्रतज्ज्ञ डॉ. नि. तु. पाटील यांनी संघाच्या आगामी उपक्रमांवर आपले विचार मांडले. प्रभाकर झांबरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर आभार प्रदर्शन विश्वनाथ वाणी यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप सामूहिक पसायदानाने करण्यात आला.