निंबादेवी धरणात बुडाली दोन बालके !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील निंबादेवी धरणात पोहण्यासाठी गेलेले दोन बालके यात बुडाली असून यातील एक बालकाचा मृतदेह मिळाला असून दुसर्‍याचा अद्याप शोध सुरू आहे.

यावल तालुक्यातील निंबादेवी धरण हे आपल्या निसर्गसौदर्यासाठी ख्यात आहे. लोणावळ्याच्या भुशी डॅमप्रमाणे याला देखील पायर्‍या असल्यामुळे येथे पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटकांची वर्दळ असते. तर सध्या कडाक्याचे उन पडत असल्याने अनेक जण यात पोहण्यासाठी जात असतात. याच प्रमाणे तालुक्यातील सावखेडासीम गावाजवळच्या आदिवासी वस्तीवरील नेनू किसान बारेला ( वय १०) आणि आसाराम शांतीराम बारेला ( वय १४) हे धरणावर काल सायंकाळी आंघोळीसाठी गेले होते.

ही दोन्ही बालके पाण्यात उतरल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. परिणामी दोन्ही जण यात बुडाले. ही माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांचा शोध सुरू केला. यात आसारामचा मृतदेह आढळून आला असला तरी नेनूचा पत्ता लागला नाही. रात्री उशीरापर्यंत ही शोध मोहिम सुरू होती. तर, दोन बालकांच्या मृत्यूमुळे आदिवासी वस्तीसह परिसरावर शोककळा पसरली आहे.

Protected Content