शेतात काम करताना विजेचा शॉक लागून दोन सख्ख्या भावाचा मृत्यू

कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शेतात काम करताना विजेचा शॉक लागून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली आहे. ही घटना शाहुवाडी तालुक्यातील कोपार्डे गावात घडली. कडवी नदीजवळ असणाऱ्या शेतात रोपे लागण करून तणनाशक मारण्यास गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा उच्च विद्युत वाहिनी तारेला स्पर्श होऊन दुर्दैवी अंत झाला. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

सुहास कृष्णा पाटील आणि स्वप्नील कृष्णा पाटील अशी या दोन मृत्यू झालेल्या सख्या भावांची नाव आहेत. त्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शाहूवाडी तालुक्यातील मौजे कोपार्डे गावात आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास कृष्णा आणि स्वप्नील शेतात काम करत होते. यावेळी त्यांचा विजेच्या खांबाला स्पर्श झाला आणि त्यांना विजेचा धक्का बसला. यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी शिवारात धाव घेतली. मात्र, तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता.

सुहास आणि स्वप्नील दोघेजण सकाळच्या सुमारास भाताची लागण करून दुपारी शेतात तणनाशक मारण्यासाठी गेले होते. तणनाशक मारत असताना मोठा भाऊ सुहासला विजेचा शॉक लागला. यामुळे तो शेतात बेशुद्ध पडला होता. त्याला काय झाले हे पाहण्यासाठी स्वप्निल त्याच्याजवळ गेल्यानंतर त्यालाही विजेचा धक्का बसून दोघे भाऊ शेतात निपचित पडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दोन्ही मुले बराच वेळ झाले तरी घरी न परतल्याने त्यांचे वडील कृष्णा पाटील शेतात गेले. तेथे गेल्यावर दोन्ही मुले निपचिप पडल्याचे पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी आरडा-ओरड करून नागरिकांना गोळा केले. मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. दोन्ही मुले नियतीने हिरावून घेतल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान या घटनेचा पंचनामा शाहूवाडी पोलिसांनी करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूर ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पावसाळ्यात विजेच्या तुटून शेतात पडलेल्या असतात त्यांचा स्पर्श होऊन मृत्यू झाल्याच्या घटना याआधीही अनेक वेळा समोर आल्या आहेत.

 

Protected Content