जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मामाच्या शेताचा व्यवहार केल्याचा राग मनात धरून दोन जणांना लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना सोमवारी ३ मार्च रोजी संध्याकाळी उमाळा येथील कंडारी फाटा, पेपर मिलसमोर घडली. याप्रकरणी संशयित रविंद्र कोळी (रा. कांचन नगर) याच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील कंडारी येथील नरेंद्र वाल्मिक सोनवणे शेती व्यवसाय करतात. सोमवारी ३ मार्च रोजी रविंद्र कोळी याने त्यांना कंडारी फाट्याजवळ अडवले. त्याठिकाणी “तू माझ्या मामाच्या शेताचा व्यवहार केला असे बालून नरेंद्र सोनवणे याच्याशीवाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर लाकडी दांडक्याने हातावर व पायावर मारून त्यांना जखमी केले.
यावेळी कैलास रिवाजकर हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता, आरोपीने (एमएच १९, बीडी ००२३) क्रमांकाच्या दुचाकीची तोडफोड करून नुकसान केले. दरम्यान, नरेंद्र सोनवणे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, संशयित रविंद्र कोळी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोहेकॉ मुकुंद पाटील करीत आहेत.