जैन इरिगेशनमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा; कर्मचारी सुरक्षेसाठी विशेष उपक्रम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘सुरक्षा आणि स्वास्थ्य विकसित भारतासाठी आवश्यक’ या संकल्पनेने जैन इरिगेशन सिस्टीम्सच्या विविध आस्थापनांमध्ये ५४ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह सुरू झाला आहे. जैन फार्मफ्रेश फूडच्या जैन फूड पार्क, जैन व्हॅली, जैन एनर्जी पार्क, जैन अॅग्रीपार्क, प्लास्टिक पार्क, तसेच गांधी रिसर्च फाऊंडेशन, अनुभूती निवासी स्कूल आणि अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल येथे या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ४ मार्च ते १० मार्च या कालावधीत हा सप्ताह विविध उपक्रमांसह साजरा केला जाणार आहे.

आज सकाळी सुरक्षा प्रतिज्ञा घेऊन सप्ताहाची सुरुवात झाली. या निमित्ताने सुरक्षा प्रशिक्षण, निबंध स्पर्धा, सेफ्टी व्यंगचित्र स्पर्धा आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षा विषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जैन फूड पार्क येथे झालेल्या जनजागृतीपर कार्यक्रमात जैन फार्मफ्रेश फूड्स आणि जैन इरिगेशनचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाला वरिष्ठ सहकारी सुनील गुप्ता, व्ही.पी. पाटील, जी.आर. पाटील, जी.आर. चौधरी, असलम देशपांडे, आर.डी. पाटील, वाय.जे. पाटील, पंकज लोहार, निखील भोळे, मनोज पाटील, नितीन चौधरी, हेमकांत पाटील आणि महेंद्र पाटील उपस्थित होते.

प्लास्टिक पार्कमधील प्रशासकीय इमारतीसमोर सुरक्षा विभागाचे योगेश बाफना यांनी कर्मचाऱ्यांना सुरक्षा नियमांचे पालन करण्याची शपथ दिली. यावेळी उद्योग क्षेत्रातील सुरक्षितता आणि आरोग्य जागरूकता वाढवण्याचे महत्त्व विशद करण्यात आले. सुरक्षा विभागाचे अधिकारी कैलास सैंदाणे यांनी सुरक्षिततेविषयी जनजागृती करून कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा दिली.

४ मार्च १९६६ रोजी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना झाली होती. त्यानिमित्ताने दरवर्षी ४ मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. औद्योगिक आणि व्यावसायिक ठिकाणी अपघात टाळण्यासाठी सुरक्षा नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. “जागरूकता आणि सावधगिरी बाळगल्यास अपघात रोखता येतात आणि जीव व कंपनीचे नुकसान टाळता येते,” असे सुरक्षा अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

Protected Content