जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र चॅप्टर ऑफ असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया या प्रतिष्ठित वैद्यकीय संघटनेच्या राज्य कार्यकारिणीवर जळगावच्या डॉ. स्नेहल फेगडे आणि डॉ. रोहन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. डॉ. स्नेहल फेगडे यांची सचिवपदी, तर डॉ. रोहन पाटील यांची कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली असून, या यशामुळे जळगावच्या वैद्यकीय क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
नुकतेच महाराष्ट्र चॅप्टर ऑफ असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाचे वार्षिक मतदान पार पडले. या निवड प्रक्रियेत डॉ. स्नेहल फेगडे यांची सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यापूर्वी त्यांनी दोन वेळा संघटनेच्या कार्यकारिणी सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. आता सचिवपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मुंबई आणि पुण्याबाहेरील ग्रामीण भागातील सर्जनला या स्तरावर प्रथमच संधी मिळाल्याने त्यांच्या निवडीचे वैद्यकीय क्षेत्रातून विशेष स्वागत होत आहे.

डॉ. रोहन पाटील यांचीही संघटनेच्या कार्यकारिणी सदस्यपदी प्रथमच बिनविरोध निवड झाली आहे. जळगाव शहरातून प्रथमच दोघांना एकाच वेळी राज्यस्तरीय कार्यकारिणीत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे ही निवड जळगावच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया ही शल्यचिकित्सा क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांची महत्त्वपूर्ण संघटना असून, तिच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीवर जळगावच्या डॉक्टरांना मिळालेली संधी ही स्थानिक वैद्यकीय क्षेत्राच्या वाढत्या योगदानाची दखल मानली जात आहे. डॉ. फेगडे आणि डॉ. पाटील यांच्या निवडीमुळे जळगावमधील शल्यचिकित्सा क्षेत्राला राज्यस्तरावर अधिक प्रभावी प्रतिनिधित्व मिळणार आहे.
या दोघांच्या यशाबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशनच्या जळगाव शाखेसह जिल्ह्यातील शल्यचिकित्सा क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या माध्यमातून जळगावच्या वैद्यकीय क्षेत्राचा नावलौकिक राज्यपातळीवर अधिक वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
डॉ. स्नेहल फेगडे यांची सचिवपदी आणि डॉ. रोहन पाटील यांची कार्यकारिणी सदस्यपदी झालेली बिनविरोध निवड जळगावसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या निवडीमुळे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राला राज्यस्तरावर नवे प्रतिनिधित्व मिळाले आहे.



