Home क्राईम पती मुलांसह जेवणासाठी बाहेर गेले असताना विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

पती मुलांसह जेवणासाठी बाहेर गेले असताना विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

0
13

वरणगाव, ता. १ : लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वरणगाव येथील आयुध निर्माणी वसाहतीत एका ४० वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. ३१) रात्री उघडकीस आली. पती आणि दोन्ही मुले जेवणासाठी बाहेर गेल्यानंतर ही घटना घडली. रात्री घरी परतल्यानंतर मोठ्या मुलाला आई गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. रेहाना सैय्यद मोहम्मद अली (वय ४०) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेहाना यांचे पती सैय्यद मोहम्मद अली कुतुब अली (वय ४०) हे आयुध निर्माणी वरणगाव येथे डी.बी.डब्ल्यू. पदावर कार्यरत आहेत. नोकरीनिमित्त ते पत्नी आणि दोन मुलांसह आयुध निर्माणी वसाहतीतील बिल्डिंग क्रमांक २९ जी, टाईप ३ येथे वास्तव्यास होते. त्यांचे मूळ गाव भुसावळ येथील द्वारकानगर, अकबर थिएटरच्या मागील परिसरात आहे.

शनिवारी सकाळी साडेसहा वाजता ड्युटी संपवून पती घरी परतले, त्यावेळी पत्नी आणि मुले झोपलेली होती. त्यामुळे त्यांनीही विश्रांती घेतली. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पती मोठा मुलगा सुफयान याच्यासोबत आयुध निर्माणी वसाहतीतील मशिदीत नमाज पठणासाठी गेले होते. सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ते घरी परतल्यानंतर पत्नी आणि मुलांना भुसावळ येथे बाहेर जेवणासाठी घेऊन जाण्याबाबत त्यांनी विचारणा केली. यावेळी पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या कारणावरून रेहाना या पतीशी बोलत नसल्याने त्यांनी बाहेर जेवणासाठी जाण्यास नकार दिला. त्यामुळे पती दोन्ही मुलांना सोबत घेऊन भुसावळ येथे जेवणासाठी गेले. यावेळी रेहाना या घरात एकट्याच होत्या.

रात्री दहा वाजेच्या सुमारास पती दोन्ही मुलांसह जेवण करून घरी परतले. त्यानंतर मोठा मुलगा सुफयान बेडरूममध्ये गेला असता त्याला आई गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. हा प्रकार पाहताच त्याने मोठ्याने आवाज देऊन वडिलांना बोलावले. पतीने तातडीने दोरी कापून रेहाना यांना खाली उतरवले. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी रेहाना यांना तातडीने वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. रविवारी (ता. १) सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी नांदगाव येथील माहेरच्या नातेवाइकांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. या घटनेप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास वरणगाव पोलीस करीत आहेत. किरकोळ वादानंतर घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे आयुध निर्माणी वसाहतीत हळहळ व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound