यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना विविध शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ थेट मिळावा, या उद्देशाने यावल तालुक्यातील आसराबारी येथे ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ विशेष लाभार्थी शिबिराचे आयोजन करण्यात आले. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित या शिबिरात विविध शासकीय विभागांनी एकाच छताखाली सेवा उपलब्ध करून दिल्या. यामध्ये जातीचे दाखले, रेशन कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, आरोग्य तपासणी, कृषीविषयक मार्गदर्शन यांसह विविध योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला.
आमदार अमोल जावळे यांच्या निर्देशानुसार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. शिबिरात विविध शासकीय विभागांचा समन्वय साधून नागरिकांना योजनांची माहिती, आवश्यक दाखल्यांचे वितरण, आरोग्य तपासणी आणि शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला. याशिवाय गावातील पाणीपुरवठा, वीज आणि रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांचा आढावा घेऊन संबंधित प्रश्नांवर आवश्यक कार्यवाही करण्याचे नियोजन करण्यात आले. आदिवासी विकास विभागामार्फत दोन बचत गटांसह तीन वैयक्तिक लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात आले. महसूल विभागाच्या वतीने दहा लाभार्थ्यांना जातीचे दाखले वितरित करण्यात आले. ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत ३० मनरेगा जॉब कार्ड, दहा जन्म दाखले तसेच एका मृत्यू दाखल्यासंदर्भातील सेवा उपलब्ध करून देण्यात आली.

पुरवठा विभागामार्फत १४ लाभार्थ्यांना रेशन कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच दोन लाभार्थ्यांना उत्पन्नाच्या दाखल्यांसंदर्भात, तर एका लाभार्थ्याला संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सेवा उपलब्ध करून देण्यात आली. भूमी अभिलेख विभागामार्फत १२ लाभार्थ्यांना आवश्यक माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. कृषी विभागाच्या माध्यमातून २५ महिला शेतकऱ्यांना महिला शेतकरी योजनेची माहिती देण्यात आली. तसेच ३० लाभार्थ्यांना सेंद्रिय शेती आणि खेती बचाव योजनेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सेतू सुविधा केंद्र, वड्री येथे उत्पन्नाच्या दाखल्यांसाठी तीन अर्ज प्राप्त झाले.
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १६ गोल्डन आभा कार्ड आणि नऊ आभा कार्डसंदर्भातील सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव यांच्या माध्यमातून ३२ लाभार्थ्यांची, तर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव यांच्या माध्यमातून ६९ लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी नागरिकांना आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन व सेवा देण्यात आल्या. पशुसंवर्धन विभागाच्या वैरण योजनेंतर्गत पाच लाभार्थ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले. या शिबिरामुळे दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांना विविध शासकीय कार्यालयांचे उंबरठे वारंवार झिजवण्याची गरज कमी झाली. दाखले, आरोग्य सेवा, कृषी मार्गदर्शन आणि विविध कल्याणकारी योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळाल्याने नागरिकांचा वेळ व श्रम वाचण्यास मदत झाली. शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
या उपक्रमासाठी फैजपूरचे प्रांताधिकारी बबनराव काकडे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रवीण दाभाडे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सपकाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. तसेच भाजपच्या प्रदेश सदस्य तथा परसाडेच्या सरपंच मीनाताई तडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य सविताताई भालेराव, प्रभाकर आप्पा सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती हर्षल भाऊ पाटील, वड्रीचे सरपंच अजय भालेराव, भाजप यावल तालुकाध्यक्ष सागर भाऊ कोळी, संदीप पाटील, देविदास भाऊ बारेला आणि रामलाल भाऊ बारेला यांनीही या उपक्रमासाठी मार्गदर्शन व सहकार्य केले.



