बैलांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

0
9

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अडावद पोलिसांनी सकाळी उशिरा केलेल्या कारवाईत बेकायदेशीररित्या बैलांची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली. अडावद-चोपडा मार्गावर शेतकी शाळेजवळ ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी 1 लाख रुपयांचे वाहन आणि सुमारे 30 हजार रुपये किंमतीचे दोन बैल जप्त केले आहेत.

या संदर्भातील वृत्त असे की, काल दिनांक 27 मे 2025 रोजी सकाळी सुमारे पाच वाजता अडावद-चोपडा रोडवरील शेतकी शाळेजवळील परिसरात संशयित वाहन पोलिसांच्या निदर्शनास आले. तपासणीअंती वाहनात बेकायदेशीरपणे बैलांची वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले. यात दोन बैलांना कोंबून त्यांची अवैध तस्करी करण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी अडावद पोलीस स्टेशन येथे गु.रजि. नं. 136/2025 अन्वये प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 11(1)(ड), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5(अ)(ब), तसेच मोटर वाहन कायदा कलम 83/177 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात फिर्यादी म्हणून पोलीस नाईक प्रदीप नंदसिंग पाटील (वय 35, नेमणूक अडावद पोलीस स्टेशन) यांनी तक्रार दाखल केली. गुन्ह्यात आरोपी म्हणून संदिप रमेश शिरसाठ (वय 42, रा. सुंदरगढी, चोपडा) आणि शेख मकसुद शेख तुकडू कुरेशी (रा. चोपडा) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत दोन बैलांची मुक्तता करण्यात आली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, गुन्ह्याचा पुढील तपास अडावद पोलिस स्टेशनमार्फत करण्यात येत आहे.