सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील ग्रामीण रूग्णालयाला राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी राजेंद्र चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
सावदा नगरपालिकेने उभारलेल्या ग्रामीण रूग्णालयाला राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी युतीच्या वतीने काही दिवसांपूर्वीच लाक्षणीय उपोषण करण्यात आले होते. आमदार चंद्रकांत पाटील आणि आमदार अमोल जावळे यांच्या आश्वासनानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले होते. आता या प्रकरणी राजेंद्र चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात नमूद केले आहे की, सावदा नगरपालिकेने 2010 साली ग्रामीण रूग्णालय उभारतांना याला राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय हे नाव द्यावे असा प्रस्ताव मंजूर केला होता. यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी राज्य सरकारच्या 2012 सालच्या निर्णयाचा संदर्भ देत याला महाराजांचे नाव देणे अशक्य असल्याचे सांगितले होते. तथापि, राज्य शासनाच्या या निर्णयाआधीच हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असल्याने याचे नामकरण करण्यात यावे अशी सावदेकरांची मागणी आहे. दोन्ही आमदारांनी याला पाठींबा दिलेला आहे. तरी जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवून याचे राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय नामकरण करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.