Home प्रशासन वरणगावात महाविकास आघाडीचे चक्काजाम आंदोलन 

वरणगावात महाविकास आघाडीचे चक्काजाम आंदोलन 


वरणगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात महाविकास आघाडीच्या वतीने केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात शुक्रवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. महागाई, पेट्रोल-डिझेलची कृत्रिम टंचाई, वाढती बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले.

वरणगाव शहरातील तिरंगा सर्कल परिसरात हे आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत केंद्र सरकारच्या विविध धोरणांचा निषेध व्यक्त केला. हातात फलक घेऊन आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणा दिल्या. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारवर इंधनाची कृत्रिम टंचाई निर्माण केल्याचा आरोप करत नागरिकांना जाणूनबुजून त्रास दिला जात असल्याचे म्हटले. महागाईमुळे घरगुती खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला असून सामान्य कुटुंबांचे बजेट कोलमडले आहे. त्याचबरोबर बेरोजगारीच्या प्रश्नावर सरकार अपयशी ठरत असल्याची टीकाही करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे ग्रामीण भागातील परिस्थिती गंभीर बनली असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. कृषी उत्पादनांचे दर घसरत असताना उत्पादन खर्च मात्र सातत्याने वाढत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. चक्काजाम आंदोलनामुळे तिरंगा सर्कल परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवला होता. या आंदोलनात विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेत सरकारच्या धोरणांविरोधात निषेध नोंदविला. यावेळी प्रतिभा तावडे, मनोज देशमुख आणि जवरे सर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारने महागाई आणि बेरोजगारीवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.


Protected Content

Play sound