
बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याचा आणि कर्तव्यात गंभीर कसूर केल्याचा ठपका ठेवत बोदवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवडकर यांच्यासह तीन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. या धडक कारवाईमुळे जळगाव पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये टाऊन बीट प्रभारी एएसआय रवींद्र गुरचल आणि पोलीस कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड पोलीस ठाण्यात १ मे रोजी एक गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील फिर्यादी पक्षांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला होता, ज्यावरून पुढे एक अदाखलपात्र गुन्हाही नोंदवला गेला. दोन्ही पक्षांतील वाढती धुसफूस पाहता पोलीस कॉन्स्टेल नंदकिशोर धनके यांच्याकडे तातडीने प्रतिबंधक कारवाई करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, धनके यांनी परिस्थितीचे गांभीर्य न ओळखता कोणतीही चौकशी किंवा प्रतिबंधक उपाययोजना केली नाही. यामुळे दोन्ही बाजूंचा वाद अधिकच चिघळला.
दरम्यान, १९ मे रोजी हिदायत नगर भागात दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा मोठा वाद सुरू असल्याचा फोन आला. टाऊन बीट प्रभारी एएसआय रवींद्र गुरचल हे अन्य एका कर्मचाऱ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांना या दोन्ही गटांतील वैमनस्याची पूर्ण कल्पना होती. तिथेच किंवा पोलीस ठाण्यात आणून दोन्ही पक्षांवर कायदेशीर प्रतिबंधक कारवाई करणे आवश्यक असताना, गुरचल यांनी केवळ जुजबी समज देऊन त्यांना सोडून दिले. याच निष्काळजीपणाचा फायदा घेत २१ मे रोजी दोन्ही गटात हिंसक वळण लागून एकाचा निर्घृण खून करण्यात आला.
विशेष म्हणजे, या संवेदनशील परिस्थितीची आणि वादाची संपूर्ण माहिती स्थानिक नगरसेवकाने तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी फोन आणि व्हॉट्सॲपद्वारे प्रभारी अधिकारी सपोनि दीपक सुरवडकर यांना दिली होती. परंतु, इतकी गंभीर माहिती मिळूनही सुरवडकर यांनी स्वतः कोणतीही कारवाई केली नाही आणि आपल्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांनाही आदेश दिले नाहीत. वरिष्ठांना किंवा नियंत्रण कक्षालाही याबाबत अंधारात ठेवण्यात आले. पोलीस ठाण्याचे प्रमुख म्हणून कायदा-सुव्यवस्था राखण्यास सुरवडकर पूर्णपणे अपयशी ठरल्याने, वरिष्ठ कार्यालयाने अखेर या तिघांवर निलंबनाची कठोर कारवाई केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत.



