Home क्राईम एलसीबीची कारवाई ; दोन वर्षांपासून फरार असलेला मुख्य संशयित गजाआड !

एलसीबीची कारवाई ; दोन वर्षांपासून फरार असलेला मुख्य संशयित गजाआड !

0
109

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला करणे आणि घर पेटवून देण्याच्या दोन वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये तब्बल दोन वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणारा मुख्य फरार आरोपी विशाल अजय सुरवाडे (वय ३०, रा., जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २० मे रोजी अत्यंत शिताफीने जळगावातूनच जेरबंद केले आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२४ मध्ये जळगाव येथील सुरत रेल्वे गेटजवळ जुन्या वादातून मोठे भांडण झाले होते. राजमालती नगरमधील १२ ते १३ जणांच्या टोळक्याने रेहान उर्फ जानू संजू पटेल यास बेदम मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या भांडणात आरोपी विशाल सुरवाडे याचा नातेवाईक सिद्धार्थ वानखेडे याचा मृत्यू झाला होता. याचाच राग मनात धरून, विशाल आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादी राजू पटेल यांच्या राजमालती नगरमधील घरावर हल्ला चढवला, घराची प्रचंड तोडफोड केली आणि साहित्याला आग लावून अख्खे घर जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या दोन्ही गंभीर गुन्ह्यांमधील इतर आरोपींना पोलिसांनी आधीच अटक केली होती. मात्र, मुख्य संशयित आरोपी विशाल सुरवाडे हा गुन्हा घडल्यापासूनच वारंवार आपली ठिकाणे बदलून पोलिसांना चकमा देत होता. दरम्यान, २० मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपनीय व तांत्रिक माहिती मिळाली की, फरार आरोपी विशाल सुरवाडे हा जळगाव शहरात आला आहे. माहिती मिळताच पथकाने राजमालती नगर परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


Protected Content

Play sound