पवारांच्या चौकशीवरून भाजपा-राष्ट्रवादीत ट्विटर वॉर

Pawar Shah 696x364

मुंबई, वृत्तसंस्था | शिखर बँक घोटाळा प्रकरणात ‘सक्तवसुली संचलनालया’च्या (ईडी) कार्यालयाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भेट देण्याचे नाट्य गेल्या शुक्रवारी मुंबईत रंगले. दुपारपर्यंत पवार ईडीच्या कार्यालयात जाणार म्हणून अनेक ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला असतानाच कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन पवारांनी ईडीच्या कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला. त्या आगोदरच ईडीच्या अधिकाऱ्यांनी पवारांना कार्यालयात येण्याची गरज नाही गरज वाटेल तेव्हा बोलवू असे सांगितले होते. हे सर्व प्रकरण शांत होत असतानाच आता राष्ट्रवादीने या प्रकरणावर केलेल्या एका ट्विटवरुन नवा वाद सुरु झाला आहे. राष्ट्रवादीच्या या ट्विटवर भाजपाने थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधत ‘शरद पवारांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नखांची देखील सर आहे का?’ असा सवाल उपस्थित केला आहे.

 

 

काय आहे प्रकरण
शुक्रवारी पवारांनी ईडीच्या कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा पवारांचा विजय असल्याच्या अनेक पोस्ट सोशल नेटवर्किंगवर केल्या. त्यानंतर शनिवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर टीका करणारे एक व्यंगचित्र ट्विटवर पोस्ट केले. ऐसी ख्याती शिवरायांची ओळखुनि भाजपाच्या खेम्यातल्या ‘शहा’स्तेखानाची बोटे छाटुनि रयतेच्या राजाने, कष्टकऱ्यांच्या माय-बापाने ‘ईडी’चे ब्रह्मास्त्र मोडून नव्या शिवस्वराज्याची घडी बसवली…, असे कॅप्शन देत एक व्यंगचित्र पोस्ट करण्यात आले होते. या व्यंगचित्रामध्ये शाह यांना शाहिस्तेखान दाखवण्यात आले होते तर शरद पवारांना शिवरायांची उपमा देत शाह यांची ‘ईडीमहला’त बोटे कापताना दाखवण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्राकांत पाटील यांना कोपऱ्यात लपलेले दाखवण्यात आले होते. या व्यंगचित्रावर बऱ्याच जणांनी आक्षेप नोंदवल्यानंतर राष्ट्रवादीच्या ट्विटर अकाऊंटवरुन हे ट्विट डिलीट करण्यात आले.

भाजपाने दिले उत्तर
राष्ट्रवादीने हे ट्विट डिलीट केले असले तरी भाजपाने यावरुन राष्ट्रवादीचा निषेध केला आहे. ‘शरद पवार यांना छ. शिवाजी महाराजांच्या नखांची देखील सर आहे का?’, असा सवाल भाजपाने उपस्थित केला आहे. भाजपा महाराष्ट्रच्या अकाऊंटवरुन करण्यात आलेल्या या ट्विटमध्ये राष्ट्रवादीच्या डिलीट केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉर्टही पोस्ट करण्यात आला आहे. ‘स्वतःला महाराजांच्या जागी दाखवून शिवरायांची प्रतिमा मलिन करून जनभावना दुखावल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचा तीव्र निषेध या निवडणुकीत जनता मतपेटीतून यांचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही!,’ असे भाजपाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Protected Content