किरकोळ वादावरून तरुणाची हत्या

Crime 1

 

नागपूर प्रतिनिधी । उधारीवर दिलेले 200 रुपये परत मागितल्यामुळे चार मित्रांनी मिळून एका तरुणाची लोखंडी रॉडने वार करत निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना मेकोसाबाग परिसरात घडली आहे. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आकाश थापा (वय-२३), अर्नाल्ड ऊर्फ शेल्टीन (वय-२२) व गोलू शिंदे (वय-२०) आणि राज मेहता (वय माहित नाही) असे आरोपींचे नावे असून राज मेहता फरार झालेला आहे. ऋषभ हेमंत मातने (वय-२४, रा. लुंबिनीनगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाशने ऋषभचा मित्र अज्जू याच्याकडून २०० रुपये उधार घेतले होते. तो पैसे परत देत नसल्यामुळे आकाश व अज्जू या दोघांमध्ये पैशांवरुन शनिवारी सायंकाळी वाद झाला. आकाशने अज्जूला मारहाण केली. यानंतर अज्जू, ऋषभ आणि त्याच्या साथीदारांनी मिळून आकाशला मारहाण केली. स्वत:ची सुटका करीत आकाशने तेथून पळ काढला.

त्यानंतर आकाश याने अर्नाल्ड, राज मेहता, गोलू शिंदे व एका साथीदारासोबत जरीपटक्यातील जिंजर मॉल परिसरात मित्रांसोबत मद्यप्राशन करत असतांना स्वत: सोबत झालेल्या घटनेची माहिती आपल्या साथीदारांना सांगितली. यानंतर हे सर्वजण मारहाणीचा बदला घेण्यासाठी येथून निघाले. मेकोसाबाग परिसरातून ऋषभ किराणा घेऊन घरी जात असल्याचे चौघांना दिसले. त्याचवेळी चौघांनी ऋषभवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची थरारक घटना शनिवारी रात्री १० वाजता घडली. लगेच मारेकरी पसार झाले. घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी ऋषभ याला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र तपासावेळी डॉक्टरांनी ऋषभला मृत घोषित केले. जरीपटका पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांचा शोध सुरू असतांना रविवारी आकाश, अर्नाल्ड व गोलू या तिघांना अटक करण्यात आली आहे.

Protected Content