बंद पडलेल्या पोलीस चौक्या सुरू करा : उमेश नेमाडे

भुसावळ प्रतिनिधी | शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बंद पडलेल्या पोलीस चौक्या पुन्हा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.

काल गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे जिल्हा दौर्‍यावर आले असता उमेश नेमाडे यांनी त्यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, भुसावळ शहर हे रेल्वे जंक्शन आहे. येथे सर्व जाती धर्माचे लोक वास्तव्यास आहे. पूर्वी लोकसंख्या कमी असताना शहरात विविध भागात पोलिस चौक्या अस्तित्वात होत्या. आता शहराचा विस्तार होत गुन्हेगारी देखील वाढली आहे. शहरात अनेक वेळा गावठी पिस्तूल, घातक शस्त्रे पकडली गेली आहेत. लुटमार, घरफोड्या, खून हे नित्याचे झाले आहेत. यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीती, तर शहराची प्रतिमा खराब होते. यावर नियंत्रणासाठी पुरेसे पोलिस कर्मचारी नाही. यामुळे गोपाळ नगर, जामनेर रोड, नाहाटा महाविद्यालय, १५ बंगला, चांदमारी चाळ या भागातील पोलिस चौक्या बंद आहेत. बंद अवस्थेतील या चौक्या सुरू करणेसाठी कर्मचारी वाढवून द्यावे, अशी मागणी नेमाडेंनी केली.

या मागणीवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचा शब्द दिला असून या संदर्भात स्थानिक पातळीवर लवकरच निर्देश प्राप्त होतील अशी माहिती उमेश नेमाडे यांनी दिली आहे.

Protected Content