राज्य शासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : आ. गिरीश महाजन

जामनेर प्रतिनिधी | तालुक्यातील गारखेड्याजवळ झालेला भीषण अपघात हा एस.टी. कर्मचार्‍यांच्या संपामुळे झाला असून राज्य सरकारची अनास्था यासाठी कारणीभूत ठरली आहे. संपामुळे सर्वसामान्यांचे जीव जात असतांना शासन स्वस्थ बसलेले आहे. यामुळे राज्य सरकारवर या अपघात प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी मंत्री आ. गिरीशभाऊ महाजन यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

या संदर्भात वृत्त असे की, आज सकाळी सातच्या सुमारास जामनेर तालुक्यातील गारखेडा या गावाजवळ लाकूड वाहून नेणार्‍या आयशर ट्रकने प्रवाशी रिक्षाला उडविले. यात तीन जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भिती आहे. या अपघाताची माहिती मिळताच आ. गिरीशभाऊ महाजन यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना मदत केली. ते रूग्णालयात ठाण मांडून बसले आहेत. दरम्यान, या प्रकरणी एका निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.

आ. गिरीशभाऊ महाजन यांनी या निवेदनात म्हटले आहे की, आज गारखेडा येथे झालेला अपघात हा एस.टी. कर्मचार्‍यांच्या संपामुळे झालेला आहे. हा संप गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव खासगी वाहतुकीचा आश्रय घ्यावा लागत आहे. यातच आता खासगी वाहने देखील क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन प्रवास करत आहेत. यामुळे प्रवाशांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून अनेक जणांना जीव गमवावा लागत आहे. जामनेर तालुक्यातील अपघातही याच प्रकारातील आहे.

या अपघातासाठी राज्य सरकारची अनास्था कारणीभूत आहे. कारण सरकारने एस.टी. कर्मचार्‍यांचा संप संपुष्टात यावा यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. जर सरकारने प्रयत्न केले असते तर संप मिटला असता, आणि अर्थात आजचा अपघात देखील झाला नसता. यामुळे आजच्या संपासाठी संपूर्णपणे राज्य सरकार हेच जबाबदार असून यामुळे सरकारवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आ. गिरीशभाऊ महाजन यांनी या निवेदनात केली आहे. या अपघातात मृत झालेल्यांना राज्य सरकारने भरपाई द्यावी अशी मागणी देखील आमदार महाजन यांनी या निवेदनात केली आहे.

Protected Content