वादळी पावसामुळे पडलेली झाडे, खड्डे कायम; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संताप


मुक्ताईनगर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मागील आठवड्यात झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत, तर काही ठिकाणी फांद्या कोसळल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही झाडे आणि फांद्या बाजूला सारण्याची तसदीही घेतली जात नसल्याने वाहनधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आधीच खड्ड्यांनी व्यापलेल्या रस्त्यांवर पडलेल्या फांद्यांमुळे अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

तालुक्यातील साखर कारखाना ते पुरनाड फाटा दरम्यानच्या मलकापूर-बऱ्हाणपूर या मुख्य रहदारीच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी लहान-मोठी झाडे आणि फांद्या रस्त्यावरच पडल्या आहेत. यामुळे अर्धा रस्ता अडकून पडला असून, रात्रीच्या वेळी वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रकाशामुळे खड्डे आणि रस्त्यावर पडलेल्या फांद्या स्पष्ट दिसत नसल्याने किरकोळ अपघात घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग या गंभीर परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वाहनधारक करत आहेत.

या दोन राज्यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर रात्रंदिवस अवजड वाहतूक सुरू असते. जीवघेणे खड्डे बुजवून रस्त्याच्या कडेला पडलेल्या फांद्या बाजूला सारण्याची साधी जबाबदारीही सार्वजनिक बांधकाम विभाग पार पाडत नसल्याने, ‘सां.बां. विभागाला कर्तव्याचा विसर पडला आहे का?’ असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

याचबरोबर, मुक्ताईनगर येथील बऱ्हाणपूर रोडवरील स्मशानभूमीजवळून जुने घोडसगावला जाणारा नवीन बनवलेला रस्ता अवघ्या तीन-चार वर्षांतच पूर्णपणे खड्ड्यांनी व्यापला आहे. दुई-सुकळीजवळ आणि ‘राशा बरड’ येथील धोकादायक वळणावर असलेल्या खड्ड्यांमुळे अनेक वाहने नादुरुस्त झाली आहेत. स्थानिक नागरिक आता डोलारखेडा फाटा-जुने घोडसगाव-कुंड मार्गे प्रवास करणे पसंत करत आहेत. मुक्ताईनगर तालुक्यात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, आ. एकनाथराव खडसे आणि आ.चंद्रकांत पाटील यांसारखे वजनदार राजकीय नेते असतानाही संबंधित विभागाचा हा हलगर्जीपणा कसा चालतो, असा प्रश्न जनतेत चर्चिला जात आहे.