औद्योगिक विकास महामंडळात डमी उमेदवार बसवून नोकरीचा प्रयत्न; ४ वर्षांनंतर गुन्हा दाखल


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात (MIDC) नोकरी मिळवण्यासाठी एका उमेदवाराने चक्क डमी उमेदवार बसवून फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अर्जातील फोटो, प्रत्यक्ष परीक्षेतील फोटो आणि कागदपत्र पडताळणीवेळीचा फोटो यामध्ये तफावत आढळून आल्यानंतर ही फसवणूक उघड झाली. चार वर्षांच्या चौकशीनंतर अखेर या उमेदवाराविरुद्ध रामानंदनगर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सरळ सेवेने ८६५ पदांसाठी भरती जाहीर केली होती. १७ जुलै २०१९ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर २० ते २७ ऑगस्ट २०१९ दरम्यान ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. राहुल रोहिदास पावरा या उमेदवाराने मु.जे. महाविद्यालयात परीक्षा दिली होती.

या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर सन २०२१ आणि नंतर २०२२ मध्ये सुधारित निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली. यादीतील उमेदवारांची २० फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबईत कागदपत्रांची छाननी करण्यात आली. याचवेळी राहुल पावरा या उमेदवाराच्या छायाचित्रांमध्ये मोठी तफावत आढळून आली. यानंतर छायाचित्रांची फेरतपासणी करण्यात आली आणि अहवाल मुंबईच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पडताळणीसाठी पाठवण्यात आला.

प्रयोगशाळेच्या तपासणीत, उमेदवाराने भरलेल्या अर्जावरील फोटो, ऑनलाईन परीक्षा देताना असलेला फोटो आणि कागदपत्र पडताळणीवेळीचा फोटो हे तिन्ही वेगवेगळे असल्याचे निष्पन्न झाले. याचा सविस्तर एक्झामिनेशन रिपोर्ट मिळाल्यानंतर, अखेर १५ मे रोजी कारवाईचे आदेश आले. त्यानुसार, बुधवारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहायक नम्रता पवार यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिसांत राहुल रोहिदास पावरा याच्याविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.