भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील किन्ही एमआयडीसी येथे सेंट पॉल स्कूलच्या बांधकामस्थळावर राहणाऱ्या एका दांपत्यामध्ये कौटुंबिक वाद विकोपाला जाऊन पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी हातोडा टाकून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवार, २० मे रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, याप्रकरणी बुधवार, २१ मे रोजी सायंकाळी ५ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, खरगोन (मध्य प्रदेश) जिल्ह्यातील भगवानपुरा येथील रहिवासी असलेले संतोष लालिया करते आणि त्यांची पत्नी आशाबाई संतोष करते हे दोघे किन्ही गावातील सेंट पॉल स्कूलच्या बांधकाम ठिकाणी वास्तव्याला होते. त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होता. मंगळवार २० मे रोजी मध्यरात्री १ ते ३ वाजेच्या सुमारास संतोष आणि आशाबाई यांच्यात पुन्हा वाद झाला. या वादादरम्यान संतापाच्या भरात संतोषने जवळ पडलेला लोखंडी हातोडा उचलून आशाबाई यांच्या डोक्यात मारला.
या हल्ल्यात आशाबाई यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती आशाबाई यांचा भाऊ राजेश बारीला यांनी भुसावळ तालुका पोलिसांना दिली. त्यांच्या तक्रारीवरून, संतोष लालिया करते याच्याविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे करत आहेत.