
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल आणि मुक्ताईनगर तालुक्यात वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे केळी बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, “विमा कंपन्यांनी तांत्रिक मुद्द्यांवर चालवलेला वेळकाढूपणा आणि खोडसाळपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही,” असा इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरावठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. तसेच, बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट ‘मध्यप्रदेश पॅटर्न’ राबवण्याची आग्रही मागणी बैठकीत केली.

कृषी मंत्रालयाच्या दालनात कृषीमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली वादळी वाऱ्याने व गारपिटीने नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी एका विशेष आढावा व उपायोजना बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विमा कंपन्यांना सुनावले खडेबोल
बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पीक विमा कंपन्यांच्या आडमुठ्या धोरणावर अत्यंत परखड शब्दात तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यात सुमारे १८ हजार हेक्टर केळीचे क्षेत्र वादळी वाऱ्याने प्रभावित झाले असून, १६ हजार ३०० शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत ऑनलाईन प्रस्ताव सादर केले आहेत.
”विमा कंपन्या ‘ओव्हर क्षेत्राचे’ (अतिरिक्त क्षेत्र) तांत्रिक कारण पुढे करून अनेक शेतकऱ्यांना विम्याच्या लाभापासून हेतूत: वंचित ठेवण्याचे काम करत आहेत,” असा गंभीर आरोप पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. त्यांनी उपस्थित विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींवर प्रश्नांची सरबत्ती करत त्यांना अक्षरशः धारेवर धरले आणि शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याच्या कडक सूचना दिल्या.
आमदार चंद्रकांत पाटील यांची ‘मध्यप्रदेश पॅटर्न’ राबवण्याची आग्रही मागणी
या अत्यंत संवेदनशील बैठकीत मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बाजूने आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी मध्यप्रदेश सरकारच्या २०२३ मधील शासन निर्णयाचा थेट दाखला दिला. ”मध्यप्रदेश सरकारने केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी जो विशेष नुकसान भरपाई पॅटर्न राबवला आहे, तसाच पॅटर्न महाराष्ट्रातही राबवून शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी,” अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी कृषीमंत्र्यांकडे केली.
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या या मागणीची कृषीमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली. “राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची मान्यता घेऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मी स्वतः मंत्रिमंडळासमोर हा विषय आग्रहपूर्वक मंजूर करून घेऊ,” असे आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
सॅटेलाईट सर्वेक्षणावर अवलंबून न राहता सरसकट भरपाई द्या: आमदार अमोल जावळे
यावेळी रावेरचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनीही शेतकऱ्यांची बाजू मांडली. “विमा कंपन्यांनी सॅटेलाईटच्या आधारे केलेले सर्वेक्षण शेतकऱ्यांचे नुकसान करणारे आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने केलेले मॅन्युअल पंचनामेच ग्राह्य धरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट भरपाई देण्यात यावी,” अशी मागणी त्यांनी केली. तसेच केळी महामंडळाच्या कामाला गती देण्याची विनंती त्यांनी केली.
कृषीमंत्री ॲक्शन मोडमध्ये; ड्रोनद्वारे सर्वेक्षणाचे आदेश
पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आक्रमक भूमिकेनंतर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे तातडीने ॲक्शन मोडमध्ये आले. त्यांनी उपस्थित आणि व्ही.सी. द्वारे जोडलेल्या सर्व अधिकाऱ्यांना खालील आदेश दिले: महसूल, कृषी विभाग आणि विमा कंपन्यांनी पंचनामे लवकर आणि अचूक करावेत.
विमाधारक तसेच विमा नसलेल्या (विमाविहीन) सर्वच शेतकऱ्यांच्या नुकसानीची काटेकोर नोंद घ्यावी. आवश्यकतेनुसार ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वेक्षण गतीने पूर्ण करावे.कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून कार्यशाळा आयोजित करून केळी पिकावरील उपायांची दिशा निश्चित करावी.
बैठकीला उपस्थित मान्यवर
या महत्त्वपूर्ण बैठकीला व्ही.सी. द्वारे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषी आयुक्त सुरज मांढरे जोडले गेले होते. तर प्रत्यक्ष बैठकीत कृषी सचिव परिमल सिंह, संचालक रफीक नाईकवडी, विनयकुमार आवटे, जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे, भारतीय कृषी विमा कंपनीचे मुख्य प्रबंधक अजित कुमार, उपव्यवस्थापक अतुल झनकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, माजी जि.प. सदस्य विनोद तराळ, सरचिटणीस विवेक ठाकरे, रावेर तालुका शिवसेना संघटक राहुल पाटील (गुरुजी), माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन आणि माजी जि.प. सदस्य सुनील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.



