बोदवडात ‘महाराजस्व समाधान शिबिरा’चे आयोजन; लाभ घेण्याचे आवाहन

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील नागरिकांचे महसुली प्रश्न जागेवरच सोडवण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ राबवण्यात येत आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून बोदवड मंडळात २६ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता अग्रसेन भवन, बोदवड येथे एका विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बोदवडच्या तहसीलदारंनी नागरिकांना या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

या शिबिराचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्न आणि तक्रारींचे जागेवरच, जलद गतीने निराकरण करणे हा आहे. बोदवड मंडळातील बोदवड, मनुर बु., मनुर खुर्द, चिखली बु., शेवगे बु., चिंचखेड प्र.बो., राजूर, वरखेड बु., वरखेड खुर्द या गावांच्या नागरिकांसाठी हे शिबिर विशेषत्वाने आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात नागरिकांच्या विविध विभागांशी संबंधित कामांसाठी महसूल, पंचायत समिती, पोलीस, नगरपंचायत, कृषी, शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, पाणी पुरवठा, वनविभाग, पशुसंवर्धन, बाल विकास, कोषागार, निबंधक कार्यालय, क्रीडा आणि भूमी अभिलेख यांसह अनेक महत्त्वाच्या विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी अनेक विभागांशी संबंधित कामे मार्गी लावता येणार आहेत.

शिबिरात महसूल विभागाशी संबंधित रहिवासी, उत्पन्न, जातीचे दाखले, संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना यांसारख्या सामाजिक लाभाच्या योजनांचे अर्ज, रेशन कार्ड वाटप इत्यादी विविध प्रमाणपत्र वाटप आणि इतर महसुली कामांचा निपटारा करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी तालुका किंवा जिल्हा स्तरावर ये-जा करण्याची गरज भासणार नाही, त्यांचा वेळ आणि पैसा वाचेल. प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक आणि जलद गतीने होण्यासही हे शिबिर उपयुक्त ठरेल. तरी, बोदवड मंडळातील सर्वसामान्य जनता, शेतकरी बांधव, विद्यार्थी आणि माता-भगिनींना या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदारंनी केले आहे.

Protected Content