शिंदे गटाचे नितीन सोनार यांचे उपोषण मागे; लेखी आश्वासनानंतर तोडगा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयासमोर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितीन सोनार यांनी सुरू केलेले उपोषण लेखी आश्वासन मिळाल्यानंतर मागे घेण्यात आले आहे. त्यांच्या कालिका पतसंस्थेच्या गैरकारभाराबाबत संबंधित दोषींवर कारवाई व्हावी यासह विविध मागण्यांसाठी त्यांनी हे उपोषण सुरू केले होते.

नितीन सोनार यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाला पत्र देऊन कालिका पतसंस्थेचे चेअरमन यांच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. या कार्यालयाकडे अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट असून, त्यांचा अद्याप निकाल लागलेला नाही. तसेच, लेखा परीक्षणानंतर काही जण दोषी आढळले असल्याचेही सोनार यांनी नमूद केले होते. या आर्थिक गैरव्यवहारात सहभागी असलेल्यांवर गुन्हे दाखल करण्याची त्यांची मुख्य मागणी होती.

कार्यालयाकडून आपल्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही न झाल्याने, सोनार यांनी बुधवार, २१ मे रोजी उपोषणाला सुरुवात केली होती. मात्र, उपोषण सुरू झाल्यानंतर काही तासांतच कार्यालयाच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक अच्युत भागानगरे यांच्या स्वाक्षरीचे आणि मुख्य लिपिक निबंधक कार्यालय के.व्ही. पाटील यांच्या प्रतिनिधींनी उपोषणकर्ते नितीन सोनार यांना लेखी आश्वासन पत्र दिले. या पत्रामध्ये त्यांच्या मागण्या लवकरच मान्य केल्या जातील असे नमूद करण्यात आले होते. या लेखी आश्वासनानंतर सोनार यांनी आपले उपोषण मागे घेतले.

नितीन सोनार यांच्या उपोषणस्थळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे, शिवसेनेचे सुर्यभान पाटील, शिवसेनेच्या शिंदे गटाचे तालुका प्रमुख राजु काटोके, सावंता माळी सेनेचे जिल्हा अध्यक्ष संदीप माळी, प्रभाकर सपकाळे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते रामभाऊ सोनवणे आदींनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला होता.

Protected Content