
यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त मनवेल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपणाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. वाढदिवसाचा खर्च टाळून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत आ. अमोल जावळे मित्र परिवार साकळी-मनवेल परिसराच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

दरवर्षी आमदार अमोल जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक आणि मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जातो. मात्र, यावर्षी रावेर-यावल मतदारसंघात झालेल्या वादळामुळे अनेक शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्वतः आमदार अमोल जावळे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. वाढदिवसानिमित्त होर्डिंग, बॅनर्स, पोस्टर्स, पुष्पगुच्छ किंवा जाहिरातींवर खर्च न करता प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावावा आणि आपल्या शेतात ‘जलतारा’ तयार करावा, असे आवाहन आमदार अमोल जावळे यांनी केले होते. त्याच आवाहनाला प्रतिसाद देत मनवेल येथे वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला.
आ. अमोल जावळे मित्र परिवार साकळी-मनवेल परिसर घटक, भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉ. सुनील पाटील आणि मनवेल ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पाटील यांच्या नियोजनातून मनवेल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संरक्षणासाठी दिलेले योगदान हीच आमदार अमोल जावळे यांच्यासाठी सर्वात मौल्यवान वाढदिवसाची भेट ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या वृक्षारोपण कार्यक्रमात पिंपळ, निंब आणि जामून यांसारख्या विविध प्रजातींची पाच फुटांपेक्षा उंच रोपे लावण्यात आली. ही रोपे उपलब्ध करून देण्यासाठी सावखेडेसीम येथील भाजपा कार्यकर्ते दिनेश आप्पा पाटील यांचे विशेष योगदान लाभले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य सिताराम कोळी, भगवान कोळी, गणेश पाटील, शिक्षणप्रेमी सदस्य गोकुळ कोळी, आशापुरी ज्वेलर्सचे प्रोप्रायटर ज्ञानेश्वर सोनार, यश मराठे, दामू पाटील, डिंगबर तायडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक चव्हाण यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रविण पाटील यांनी मानले. वृक्षारोपणाच्या माध्यमातून सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. आमदार अमोल जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त मनवेल येथे आयोजित वृक्षारोपण उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश देण्यात आला असून, वाढदिवस साजरा करण्याची सामाजिक बांधिलकीची नवी दिशा या उपक्रमाने दाखवून दिली आहे



