
वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ग्रॅपलिंग (मल्लयुद्ध) या पारंपरिक आणि आधुनिक क्रीडा प्रकाराला चालना देण्यासाठी महाराष्ट्र ग्रॅपलिंग संस्थेच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या निवडीमुळे जिल्ह्यातील शालेय क्रीडापटूंना अधिकृत स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यस्तरीय अधिकृत महाराष्ट्र ग्रॅपलिंग (मल्लयुद्ध) संस्थेच्या जिल्हा कार्यकारिणीची निवड नाशिक येथे पार पडली. राज्य ग्रॅपलिंग संस्थेच्या अध्यक्षा अर्चना देशमुख आणि राज्य सचिव संतोष देशमुख यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली. या निवडीत वरणगाव येथील सेवानिवृत्त सैनिक आणि पैलवान संजय बावस्कर यांची जळगाव जिल्हा ग्रॅपलिंग संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी पैलवान उत्तम भोई, सचिवपदी पैलवान दिलीप संगेले, सहसचिवपदी बाळासाहेब चव्हाण, तर कोषाध्यक्षपदी प्रणय बावस्कर यांची निवड झाली आहे.
संस्थेच्या सदस्यपदी महेंद्र इंगळे, सतीश मोरे, राजकिरण निकम, जितेंद्र मोरे आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. या कार्यकारिणीच्या माध्यमातून जिल्ह्यात ग्रॅपलिंग या खेळाचा प्रसार, प्रशिक्षण आणि स्पर्धांचे आयोजन करण्यावर भर दिला जाणार आहे.
महाराष्ट्र ग्रॅपलिंग संस्थेच्या वतीने दि. ११ आणि १२ जुलै २०२६ रोजी नाशिक येथील ईश्म स्पोर्ट्स अँड फिटनेस क्लब, विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी येथे पंच परीक्षा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडू, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक आणि कोच यांना अधिकृत रेफ्री म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
या प्रशिक्षणातून शालेय जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये अधिकृत पंच म्हणून काम करण्याची पात्रता मिळणार असून, राज्य संघटनेच्या अधिकृत स्पर्धा आणि तांत्रिक समितीमध्ये सहभागी होण्याची संधीही मिळणार आहे. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कोर्ससाठी पात्रता मिळविण्याचा मार्ग खुला होणार आहे.
शिबिरामध्ये अनुभवी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पंचांकडून मार्गदर्शन दिले जाणार आहे. डब्ल्यूडब्ल्यू ग्रॅपलिंगचे अद्ययावत नियम, खेळाचे तांत्रिक बारकावे, प्रात्यक्षिक प्रशिक्षण यासह लेखी आणि तोंडी परीक्षा घेण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणासाठी सर्व खेळांतील वरिष्ठ खेळाडू, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, कोच, ट्रेनर तसेच ग्रॅपलिंग आणि मल्लयुद्ध या खेळात आवड असलेल्या महिला व पुरुषांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र ग्रॅपलिंग संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सहभागी खेळाडूंना राज्यस्तरीय रेफ्री डिप्लोमा प्रमाणपत्र, राज्यस्तरीय रेफ्री लायसन्स आणि अधिकृत राज्यस्तरीय रेफ्री टी-शर्ट प्रदान करण्यात येणार आहे.
जळगाव जिल्हा कार्यकारिणीच्या निवडीमुळे जिल्ह्यातील ग्रॅपलिंग खेळाला नवी दिशा मिळणार असून, शालेय व युवा क्रीडापटूंना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.



