दहशतवाद्यांना पाकिस्तानातच प्रशिक्षण – इम्रान खानची कबुली

imran khan 2 640x360

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था | दहशतवादी संघटना अल कायदाला प्रशिक्षण पाकिस्तानातच देण्यात आल्याची कबुली खुद्द पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान याने दिली आहे. दहशतवादाविरूद्ध हा पाकिस्तानचा सर्वात मोठा कबुलीजबाब आहे. दहशतवादी संघटना अल कायदाने ९/११ सारख्या दहशतवादी कारवाया केल्या आहेत. ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यापूर्वी अल कायदाच्या दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयने प्रशिक्षण दिले होते. ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकारने दहशतवादी संघटनांबाबतचे आपले धोरण बदलले. परंतु पाकिस्तानी लष्कर तसे करू इच्छित नसल्याची माहिती त्यांनी अमेरिकन थिंक टँक ‘काऊंसिल ऑन फॉरेन रिलेशन्स’मध्ये (सीएफआर) बोलताना दिली.

 

कार्यक्रमादरम्यान, अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचे एबटाबाद येथील वास्तव्य आणि अमेरिकन नौदलामार्फत मारला गेल्याच्या घटनेचा पाकिस्तान सरकारने तपास का केला नाही? असा सवाल इम्रान खान यांना करण्यात आला. यावर उत्तर देताना आम्ही या घटनेचा तपास केला असल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयने ९/११ पूर्वी अल कायदाला प्रशिक्षण दिले होते. यामुळेच त्या संघटनेचे पाकिस्तानशी कायम संबंध जोडले जात होते, असेही ते म्हणाले.

तीन महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा कबुली
अल कायदा आणि त्याचा म्होरक्या ओसामा बिन लादेनवर पाकिस्तानकडून गेल्या तीन महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा कबुलीजबाब देण्यात आला आहे. यापूर्वी इम्रान खान यांनी ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानमध्ये असल्याची आपल्याला माहिती होती, असे म्हटले होते. आयएसआयने सीआयएला ओसामा पाकिस्तानात असल्याची माहिती दिली होती. त्याच माहितीच्या आधारावर अमेरिकेने त्याच्यावर कारवाई केली, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.

Protected Content